वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षेः राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

0
451
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट- अ मधील व राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट अमधील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षापर्यंत वाढविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत कार्योत्तर मान्यता देण्यात आली.

सध्या राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांची नितांत आवश्यकता आहे. त्यांचा अनुभव साथरोग नियंत्रणात महत्वाचा ठरु शकतो. याचा विचार करुन शासनाकडून वैद्यकीय अधिकारी गट अ आणि वरिष्ठ अधिकारी (वेतनस्तर एस-२३ : ६७७००-२०८७०० व त्यावरील) तसेच राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट-अ (वेतनस्तर एस-२० : ५६१००-१७७५००) यांचे निवृत्तीचे वय ३१ मे २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये एक वर्षासाठी ६२ वर्षांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयास कार्योत्तर मंजुरी देण्याचा तसेच त्याअनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ मधील नियम १० मध्ये आवश्यक ती सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सार्वजनिक उपक्रमांत ७ व्या वेतन आयोगासाठी निकषः राज्य सार्वजनिक उपक्रमातील कर्मचा-यांना ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारीत  वेतनश्रेणी लागू करण्याकरिता निकष निश्चित करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला.  त्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.या निकषांच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुधारित वेतनश्रेणी १ जुलैपासून परिणामकारक राहील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा