राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी, हे नेते स्पर्धेत सर्वांच्या पुढे

0
2542
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः विधान परिषदेवर पाठवायच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या १२ जागांवरील  कोरोनाच्या संकटामुळे रखडलेल्या नियुक्त्यांच्या प्रस्तावाला आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच राज्यपालांकडे १२ सदस्यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्याने दाखल झालेले एकनाथ खडसे यांचे या यादीत नाव असणार का अशीही चर्चा सुरु झाली आहे.

गेल्या महिनाभरापासून विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांची चर्चा गाजत होती. राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन्ही पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी ४ जागा आल्या आहेत. या तीनही पक्षांत अखेर एकमत होऊन १२ सदस्यांच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांना दिली.

विधान परिषदेवर पाठवायच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी लवकरच राज्यपालांकडे पाठवली जाणार आहे. मात्र, तिन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या नावाबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे. गेल्या काही दिवसांत सत्ताधारी विशेषकरून शिवसेना आणि राज्यपाल यांच्यात शाब्दिक वाद रंगलेला पाहायला मिळाला होता. त्यामुळे १२ सदस्यांच्या नावांना मंजुरी देण्याबाबत राज्यापाल काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही नावे चर्चेतः विधान परिषदेवर पाठवायच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी शिवसेनेकडून माजी आमदार सुनिल शिंदे, सचिन अहिर, मुख्यमंत्र्यांचे विश्वासू व शिवसेना सचि मिलिंद नार्वेकर, युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या नावाची तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री एकनाथ खडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे, धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर, आदिती नलावडे, शिवाजी गर्जे, काँग्रेसकडून प्रवक्ते सचिन सावंत, युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे, मोहन जोशी आणि माजी मंत्री नसीम खान यांच्या नावाची चर्चा आहे.

 उर्मिला मातोंडकरांना काँग्रेसऐवजी शिवसेनेकडून संधी?: उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या कोट्यातून संधी देण्यात येणार अशी सूत्रांची माहिती आहे. मातोंडकर यांनी या निवडणुकीतील पराभवनानंतर काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला होता. नुकत्याच झालेल्या कंगना राणावत प्रकरणात उर्मिला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच महाविकास आघाडी सरकारची बाजू जोरदारपणे लावून धरत कंगनाला प्रत्युत्तर दिले होते. उर्मिला यांचे कलेच्या क्षेत्रात योगदान आणि त्या मराठी असल्याने त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा