राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम, मात्र टप्प्याटप्प्याने निर्बंध हटवणार

0
1036
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याचे चित्र असली तरी पुन्हा धोका वाढू नये म्हणून राज्य सरकार अत्यंत सावध पावले टाकत आहे. त्यामुळेच १ जूननंतरही राज्यातील लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. मात्र कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यात काही निर्बंध उठवले जाणार आहेत. याबाबतची नवीन नियमावली दोन दिवसांत जाहीर केली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली.

राज्यातील १८ जिल्ह्यांत अजूनही पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांच्या वर आहे. त्यामुळे सध्या जे निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत, ते लगेच उठवू नयेत, याबाबत मंत्रिमंडळाचे एकमत झाले. राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे, त्या जिल्ह्यांतील निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता दिली जाईल, असेही टोपे म्हणाले. रेड झोनमध्ये असलेले जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांना त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

रुग्णसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यांत निर्बंधात कोणती शिथिलता द्यायची याबाबत राज्याच्या टास्क फोर्सशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. या जिल्ह्यांत सध्या जे निर्बंध लागू आहेत, तेथे वेळेच्या बाबतीत काही सवलत देता येईल का याचा विचार केला जाईल. याबाबत मंत्रिमंडळात आज चर्चा झाली. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेणार असल्याचे टोपे म्हणाले.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढीचा दर अजूनही जास्त आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन सरसकट उठवता येणार नाही. रुग्णसंख्या वाढती असले तर बेड्सच्या उपलब्धतेबरोबरच इतरही प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे विचारपूर्वकच निर्णय घ्यावा लागेल, असे टोपे म्हणाले.

टप्प्याटप्प्याने निर्बंध हटणारः राज्यातील कोरोना रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होत असला तरी १० ते १५ जिल्ह्यांत रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. शिवाय मुकरमायकोसीसचा धोकाही वाढतो आहे. त्यामुळे  एकदम लॉकडाऊन न उठवता १ जूननंतरही तो वाढवून मग टप्प्याटप्प्याने काही आवश्यक बाबतीत निर्बंध कमी करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा