औरंगाबादेतील गुंठेवारीची ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची पावणेदोन लाख घरे होणार नियमित

0
255
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः औरंगाबाद शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गुंठेवारीचा प्रश्न बुधवारी अखेर मार्गी लागला. शहरातील ११८ वसाहतींमधील सुमारे पावणे दोन लाख घरे नियमित करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे चार लाख नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी वारंवार पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असतानाच राज्य सरकारने औरंगाबादकरांना हे निवडणूक गिफ्ट दिले आहे.

 औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील अनधिकृतपणे विकसित झालेली गुंठेवारीतील घरे नियमित करण्यासाठी बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे ३१ डिसेंबर २०२० पर्यंत बांधण्यात आलेली गुंठेवारीतील सुमारे सव्वा लाख घरे नियमित होणार आहेत.

गेली अनेक वर्षे गुंठेवारीतील घरे नियमित करण्याचा प्रश्न प्रलंबित होता. यासाठी संभाजीनगरचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक घेतल्या. त्यांच्या या प्रस्तावाला बुधवारी मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

३१ डिसेंबर २०२० पर्यंत बांधलेली घरे होणार नियमितः राज्यातील ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या गुंठेवारी योजना नियमित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गरीब व सर्वसामान्य लोकांच्या निवाऱ्याची गरज पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमात सुधारणा करण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शहरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गुंठेवारीचा मुद्दा मार्गी लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा