सहकार कायद्यात मोठे बदल, राज्य सरकारने केल्या ‘या’ महत्त्वपूर्ण सुधारणा

0
116
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः सहकार कायद्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

९७ व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने सहकार कायद्यात सन २०१३ मध्ये विविध कलमात सुधारणा करण्यात आल्या होत्या. या सुधारणा केल्यामुळे राज्यातील सहकारी क्षेत्रावर विपरित परिणाम झाला असल्याचे निदर्शनास येत आहे.  तथापि, या घटना दुरुस्तीच सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविली असल्याने, राज्यातील सहकारी संस्थांच्या कामकाजात सुलभता आणण्याच्या हेतुने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील  विविध कलमात आवश्यक त्या सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

चला उद्योजक बनाः  एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

सहकारी संस्थेचे सदस्य अधिनियमाच्या तरतूदीप्रमाणेच नियमातील तरतुदीनुसार अपात्र ठरत असल्यास त्यांचे नाव सदस्य नोंदवहीतून काढून टाकणे शक्य व्हावे यासाठी कलम २५अ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

किमान सेवांचा वापर करूनही लागोपाठ पाच वर्षांच्या कालावधीत सहकारी संस्थांच्या सदस्य मंडळाच्या किमान एका बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे सभासद अक्रियाशील सभासद ठरतो व तो मतदान करण्याच्या मूलभुत अधिकारापासून वंचित राहतो. सहकारी संस्थांचे कार्यक्षेत्र दूर असल्याने व आजार, पूरपरिस्थिती तसेच बैठकीची सूचना वेळेत न मिळणे किवा संस्थेने न पाठविणे यामुळे सदस्य सर्वसाधारण सभेस उपस्थित राहू शकत नसल्याने कलम २६ मधील सदर तरतूद वगळण्यात आली.

सहकारी संस्थांची समिती २१ संचालकांची असेल अशी तरतूद होती. तथापि, राज्यातील सहकारी संस्थांमध्ये  सर्व महसुल विभाग/जिल्हे यांना प्रतिनिधीत्व मिळण्यासाठी तसेच काही जिल्हयांमध्ये तालुक्यांची संख्या जास्त असल्याने “अ” वर्ग संस्थांच्या संचालकांच्या प्रतिनिधीत्वाचा प्रश्न उपस्थित होत असल्याने  राज्यस्तरीय शिखर संस्थेसाठी अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये राज्यशासनाच्या पूर्वपरवानगीने सदरची संख्या २५ पर्यंत वाढविल्यास जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मिळू शकेल. अशी तरतूद करण्यात आली.

कलम ७३ कअ मध्ये एखादा सदस्य संस्थेच्या उपविधीनुसार निरर्ह ठरविणे सोयीचे व्हावे यासाठी सुधारणा प्रस्तावित करण्यात आली.

अपवादात्माक परिस्थितीमध्ये जसे की, साथरोग, अतिवृष्टी दुष्काळ, भुंकप इत्यादी कारणामुळे वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे शक्य नसल्यास पुढील तीन महिन्याचा कालावधी वाढविण्याचे अधिकार निबंधकांना देण्यात आले आहेत.

संस्थांवर नेमण्यात आलेली समिती अथवा प्राधिकृत अधिकारी यांना प्रशासकीय कामकाज करणे सुलभ व सोयीचे व्हावे यासाठी त्यांचा पदावधी ६ महिन्याऐवजी १२ महिने करण्यासाठी तसेच, संस्थावरच प्राधिकृत अधिकारी नियुक्त करण्याचे अधिकार निबंधकांना देण्याबाबत कलम ७७अ, ७८ व ७८ अ मध्ये सुधारणा करण्यात आली. यामुळे, शासकीय अर्थसहाय्य प्राप्त असलेल्या संस्थासह सर्वच प्रकारच्या संस्थांवर कलम ७८ व कलम ७८ अ नुसार प्रशासक नियुक्त करता येईल.

निबंधकास अधिक चांगल्याप्रकारे सहकारी संस्थांना एखाद्या आदेशाचे अनुपालन करण्यासाठी निर्देश देणे सोईचे व्हावे यासाठी कलम ७९ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

लेखापरिक्षण दोष दुरूस्ती करण्याचा कालावधी व दोष दुरूस्ती अहवाल सादर करणे इत्यादी संदर्भात अधिनियमाच्या स्पष्ट तरतूद नव्हती.  यासाठी कलम ८२ मध्ये  स्पष्ट तरतूद करण्यात आली. त्यामुळे सहकारी संस्थांचे लेखापरिक्षण योग्य वेळेत व योग्यरित्या होऊन सर्व सहकारी संस्थांच्यावर लेखापरिक्षणा संदर्भात दोष दुरूस्ती करणे संबंधात निबंधकांचे नियंत्रण राहू शकेल.

 या कलमातील तरतुदीनुसार अवसायनाचा दहा वर्षापर्यंत कालावधी नागरी सहकारी बँकांच्या अवसायानाच्या कामकाजाचा व्याप तसेच उद्भवणारी न्यायालयीन प्रकरणे विचारात घेता कमी पडत असल्याने हा कालावधी १५ वर्षापर्यत वाढविण्यासाठी कलम १०९ मध्ये सुधारणा करण्यात आली.

सदस्य नसलेल्या व्यक्तीकडून ठेवी स्विकारण्यास प्रतिबंध केला असल्याने सेवानिवृत्त सभासदांच्या ठेवी परत केल्यास बाहेरून कर्ज उभारून नियमित सभासदांना ज्यादा व्याज दराने कर्ज पुरवठा कारावा लागतो हे टाळण्यासाठी कलम १४४ (५)अ मध्ये सुधारणा करुन पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थामधील सेवानिवृत्त सभासदांची नाममात्र सदस्य म्हणून नोंदणी करुन त्यांच्याकडून स्वेच्छेने ठेवी स्विकारण्याची तरतूद करण्यात आली.

कोणत्याही सहकारी संस्थेच्या समितीच्या निवडणूकीत उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र फेटाळण्यात आल्यामुळे व्यथित झालेल्या  व्यक्तीस अपिल दाखल करण्यासाठी तीन दिवसाचा कालावधी दिला असून  सदर कालावधी गणना कशी करावी याबाबत स्पष्टता असणे  आवश्यक असल्याने १५२ (अ) मध्ये सुधारणा करुन कामकाजाचे तीन दिवस अशी तरतूद करण्यात आली.

शासनाचे आणि निबंधकाचे पुनरीक्षणविषयक अधिकार कलम १०५ मधील तरतुदीशी सुसंगत करून अर्जदाराला आर्थिक सवलत  देण्यासाठी कलम १५४ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

अधिनियमांच्या तरतुदीपासून संस्थांना सूट देण्याच्या शासनाच्या अधिकारात वाढ करण्यासाठी कलम १५७ मध्ये  सुधारणा करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा