इनाम व वतन जमिनीवरील अकृषिक बांधकामे नियमित करणे आता झाले अधिक सोयीचे

0
322
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः इनाम व वतन जमिनीवरील अकृषिक बांधकामे नियमित करण्यासाठी जनतेला मोठी सवलत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. प्रचलित बाजार मूल्याच्या ७५ टक्के रकमेऐवजी २५ टक्के रक्कम आकारून प्रशमन शुल्क व विकास कर वसूल करून आता ही बांधकामे नियमित केली जाणार आहेत.

नवीन अविभाज्य शर्थींने दिलेल्या इनाम व वतन (महार वतन व देवस्थान जमीन वगळून) जमिनी ज्या भोगवटादार वर्ग-२ च्या आहेत त्यांच्यावरील अकृषिक बांधकामे गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम, २००१ या कायद्यांतर्गत इनाम व वतन जमिनींवरील विकास नियमित करताना प्रशमन शुल्क व विकास आकार या रक्कमेंबरोबरच सबंधित जमिनींच्या प्रचलित बाजार मूल्याच्या ७५ टक्के रक्कम शासनाकडे भरणा करावी लागत होती.

अशा प्रकरणी जनतेला सवलत देण्याच्या दृष्टिकोनातून प्रचलित बाजार मूल्याच्या ७५ टक्के ऐवजी २५  टक्के रक्कम आकारुन व नियमित प्रशमन शुल्क आणि विकास आकार वसूल करुन अशा जमिनीवरील गुंठेवारी विकास  नियमित करण्यास मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्याबाबतचा अध्यादेश लवकरच काढण्यात येईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा