जालना येथे होणार ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय, राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

0
177
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः जालना येथे ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यामुळे मराठवाडा व विदर्भातील रुग्णांसाठी उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे.

राज्यात पुणे, ठाणे, नागपूर व रत्‍नागिरी या चार ठिकाणी प्रादेशिक मनोरुग्‍णालये आहेत. जालना शहर मराठवाडा व विदर्भासाठी मध्यवर्ती असे आहे. या भागातील रुग्‍णांना उपचारांकरिता पुणे, नागपूर येथे जावे लागते. जालना जिल्‍हयात प्रादेशिक मनोरुग्‍णालय व्हावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यानुसार जालना येथे प्रादेशिक मनोरूग्णालय उभारण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

 जालना येथील प्रादेशिक मनोरूग्णालयात रुग्णांसाठी आंतररुग्ण उपचार तसेच पुनर्वसन सुविधा उपलब्ध होणार आहे. मनोरुग्णालय उभारण्यासाठी इमारत बांधकाम, यंत्रसामुग्री  रुग्णवाहिका, औषधी व उपकरणे व मनुष्यबळ यासाठी १०४  कोटी ४४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

कृषी विद्यापीठांतील अध्यापकांना ७ वेतन आयोगः राज्यातील कृषी विद्यापीठांमधील शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्यास आज झाराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.  राज्यातील कृषी विद्यापीठे संलग्न कृषी महाविद्यालये यामधील शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची सुधारित वेतन संरचना १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यास मान्यता देण्यात आली.

जयसिंगपूर नगरपरिषदेला जमीन देण्याचा निर्णयः जयसिंगपूर नगरपरिषदेस वस्तुसंग्रहालय व ग्रंथालय उभारणीसाठी जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर नगरपरिषदेस वस्तुसंग्रहालय व ग्रंथालय उभारणीसाठी जमिनीची आवश्यकता होती. त्यासाठी जयसिंगपूर येथील सिटी सर्वे नंबर २३५७ अ/१अ/१ क्षेत्र २१०८ चौरस मीटर ही शासकीय जमीन विनामुल्य देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा