राज्यातील मंदिरे खुली करणारः मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर प्रकाश आंबेडकरांचे आंदोलन मागे

0
425
छायाचित्रः प्रकाश आंबेडकर यांचे ट्विटर हँडल

पंढरपूरः आठ ते  दहा दिवसांत नियमावली तयार करून राज्यातील मंदिरे खुली करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे पंढरपुरातील आंदोलन मागे घेतले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतःच ही माहिती दिली.

मंदिरे खुली करण्यात यावी, या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीने पंढरपुरात आंदोलन केले. या आंदोलनात हजारो वारकरी सहभागी झाले होते. प्रकाश आंबेडकर यांनी विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांच्या सोबत १५ जणांना मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात आली होती.

 राज्यात लवकरच लोकांसाठी मंदिर, मशीद, बुद्ध विहार, जैन मंदिरे सुरू केली जातील. त्यासाठी सरकार नियमावली तयार करणार आहे, अशी माहिती मला मुख्यमंत्र्यांकडून मिळाली. आठ ते दहा दिवसांत ही नियमावली तयार होईल आणि मंदिरे सुरू होतील, असे आश्वासन सरकारने दिले आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

सरकारने आश्वासन पाळले नाही तर आम्ही पुन्हा पंढरपुरात दाखल होऊ, याची नोंद सरकारने घ्यावी, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश आले असून लोकभावनेची कदर केल्याबद्दल आपण सरकारचे आभारी आहोत,असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा