स्टेअरिंग कुणाच्या हाती आहे हे महत्वाचे नाही, सरकार समन्वयाने सुरूः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
30
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः सरकारचे स्टेअरिंग कुणाच्या हाती आहे? मागे कोण बसले आहे आणि पुढे कोण बसले आहे, हे महत्वाचे नाही. आमचे सरकार समन्वयाने सुरू आहे. आमच्या नात्याची चिंता कुणीही करू नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

‘एबीपी माझा’च्या माझा व्हिजन, माझा महाराष्ट्रात या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आहेत. आमचे सरकार समन्वयाने सुरू आहे. आरोप तर सगळ्यांवरच केले जातात. मी कुणाचीही पर्वा करत नाही आणि आमच्या नात्याची चिंताही कुणी करू नये, असे ठाकरे म्हणाले.

महाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमावर सुरू आहे. या सरकारला कोणताही धोका नाही, असे स्पष्ट करतानाच माझ्यावर लोकांनी विश्वास दाखवला आहे. त्यांच्यासाठी मी खुर्चीवर बसलो आहे. माझ्या स्वार्थासाठी नव्हे, असेही ठाकरे म्हणाले.

भाजपशी संबंधित एका प्रश्नावर बोलताना ठाकरे म्हणाले की, भाजपसोबत आमचा घटस्फोट झाला आहे. त्याची कारणेही सगळ्यांनाच ठाऊक आहेत. तीस वर्षे सोबत असूनही भाजपने आमच्यावर विश्वास दाखवला नाही. परंतु ज्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आम्ही लढलो, त्यांनी मात्र माझ्यावर विश्वास दाखवला, असेही ठाकरे म्हणाले.

 बडी आसामी, अभ्यासू म्हणत फडणवीसांना टोलाः महाराष्ट्रात पुरेशा प्रमाणात चाचण्या होत नाही. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. कोरोना संसर्गावर उपाययोजना करण्यात सरकारला अपयश आले आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्याबाबत विचारले असता, फडणवीस हे अभ्यासू आहेत, बडी आसामी आहेत. त्यांना कदाचित जागतिक आरोग्य संघटनाही मार्गदर्शनासाठी बोलावतील, असा टोला ठाकरे यांनी फडणवीसांना मारला. कोरोना विरोधातील लढा सुरू आहे, पण कुणीही गाफील राहू नका, असे आवाहनही ठाकरे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा