राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशाराः गाफील राहू नका, नागरिकांचे स्थलांतर करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

0
112
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका. नागरिकांनाही गाफील राहू देऊ नका.  लोकांना माहिती देत राहा. प्राणाहानी होऊ नये यासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन स्थलांतराचे काम करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला आज दिले.

गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या परतीच्या पावसाने अर्ध्या महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज  पुणे, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्त तसेच या विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून पुरस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी संबंधित विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पुरस्थिती आणि झालेले नुकसान, करण्यात येत असलेली मदत आणि उपाययोजना यासंदर्भात विस्ताराने माहिती दिली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

मदत पथकाकडून अनेक ठिकाणी पुरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. हे करतांना कोरोनासंदर्भातील उपाययोजनांची काळजी घेण्यात यावी, मास्क, सॅनिटायझर यासारखी सुरक्षा साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत. अजूनही काही दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यकतेनुसार भविष्यात करावयाचे स्थलांतर याचेही वेळीच नियोजन करावे, स्थलांतरीत कुटुंबांची काळजी घ्या. पूर ओसरल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या घरी गेल्यास त्यांना तिथे आवश्यक ती मदत पुरवा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पुराच्या पाण्यामुळे निर्माण होणारे संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना वेगाने हाती घ्या, असेही ठाकरे म्हणाले.

तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे कराः पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतपिके आणि मालमत्तेचे जे नुकसान झाले त्याचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याची कार्यवाही तत्काळ सुरु करावी. यात जे नागरिक मरण पावले त्यांच्या कुटुंबिंयाना तातडीने आर्थिक मदत देण्याची व्यवस्था करावी,  असे निर्देशही  मुख्यमंत्र्यांनी दिले. शेती, पिकांच्या नुकसानीबरोबरच पशुधन, घरे, रस्ते, पाणीपुरवठा योजना, वीज पुरवठ्याशी संबंधित बाबी, शाळा, ग्रामपंचायत इमारती, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्या नुकसानीची माहिती घेऊन पंचनामे तातडीने करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा