मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणीः व्यवस्थापन समिती, निरीक्षकांच्या नेमणुका जाहीर

0
53
छायाचित्रः twitter/@INCMaharashtra

मुंबई राज्यात होऊ घातलेल्या महापालिका, नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणूक तयारीचा भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी १३ सदस्यांची निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन केली असून सर्व निवडणुकांसाठी पक्ष निरीक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत.

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केले आहे. तीन पक्षाचे हे सरकार कोरोना संकटावर मात करत आता स्थिरस्थावर झाले आहे. सरकारची वर्षभरातील दमदार वाटचाल व पदवीधर, शिक्षक निवडणुकीत मिळालेला दणदणीत विजयामुळे पक्षांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आगामी वर्षभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने कंबर कसली आहे.

कोल्हापूरसह नवी मुंबई, औरंगाबाद, वसई -विरार, कल्याण-डोंबिवली या पाच महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. तर २ जिल्हा परिषदा, १३ नगरपरिषदा आणि ८३ नगरपंचायतीसाठी निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारी सुरू केली असून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी १३ सदस्यांची निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन केलेली आहे. तसेच या सर्व निवडणुकांसाठी पक्ष निरीक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. याशिवाय पक्षाच्या १२ मंत्र्यांकडेही संपर्कमंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे.

दरम्यान, एप्रिल महिन्यात होणाऱ्या औरंगाबाद महानगरपालिका निवडणूकीसाठी निरिक्षक म्हणून मुझफ्फर हुसेन, किशोर गजभिये आणि दादासाहेब मुंडे यांची तर कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून अभय छाजेड, रणजीत देशमुख, पृथ्वीराज साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबईसाठी मोहन जोशी, राहुल दिवे, शितल म्हात्रे, वसई-विरारसाठी राजेश शर्मा, मेव्हुल व्होरा, गजानन देसाई आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी माजी आमदार मधु चव्हाण व अरविंद शिंदे यांना निरीक्षक म्हणून नेमण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा