‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावर बंदी घाला, शिवरायांच्या अपमानाबद्दल माफी मागा’

0
137

मुंबईः स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ यांचा 422 वा जन्मोत्सव साजरा केला जात असतानाच भाजपने ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ नावाचे पुस्तक प्रकाशित करून छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याबद्दल महाराष्ट्रभरातून संतापाची लाट उठली आहे. या पुस्तकावर तत्काळ बंदी घालावी आणि शिवरायांचा अपमान केल्याबद्दल भाजपने माफी मागावी, या मागणीने जोर धरला आहे.

दिल्लीत भाजप कार्यालयात आयोजित धार्मिक सांस्कृतिक संमेलनात ज्येष्ठ भाजप नेत्यांच्या हस्ते ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हिंदवी स्वराज्याच्या ज्वाज्वल्य स्वाभिमानाचे प्रतिक असलेल्या छत्रपती शिवरायांशी मोदींची केलेली तुलना महाराष्ट्राच्या जिव्हारी लागली असून त्यामुळे संतापाची लाट आली आहे. जगाच्या अंतापर्यंत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही. शिवरायांशी तुलना होऊ शकेल असा माणूस जन्माला आला नाही, येणार नाही, असे सांगत या पुस्तकावर तत्काळ बंदी घालून भाजपने शिवरायांचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी सोशल मीडियातून केली जात आहे.

हेही वाचा: मोदींची थेट शिवरायांशी तुलना: ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावरून देशभर संतापाची लाट!

शिवसेना नेते संजय राऊत यांनी या वादावरून महाराष्ट्र भाजपला चांगलेच धारेवर धरले आहे. ‘निदान महाराष्ट्र भाजपने यावर तरी भूमिका स्पष्ट करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना विश्वात कुणाशीच होऊ शकत नाही… एक सूर्य… एक चंद्र आणि एकच शिवाजी महाराज… छत्रपती शिवाजी महाराज…’ असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

हेही वाचा: शिवरायांच्या वंशजांनो बोला…. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ वादावर उदयन, संभाजीराजेंना आव्हान

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी शिवरायांशी बरोबरी करण्याचा अट्टहास करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, असे म्हटले आहे. हिंदुस्तानचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासी पंतप्रधान नरेंद्र मोदींची थेट तुलना करणारे पुस्तक प्रकाशित करून भाजपच्या नेत्यांनी मराठी जनांच्या भावना दुखावल्या आहेत. युगपुरुष छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणीही करु शकत नाही, हा अट्टहाट करू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा