महाराष्ट्रावर ४ लाख ७१ हजार कोटींचे कर्ज, दरडोई उत्पन्नात पिछेहाट होऊन राज्य पाचव्या क्रमांकावर

0
75
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः एकेकाळी देशातील सर्वात आघाडीचे राज्य असा  लौकीक असलेले महाराष्ट्र राज्य कर्जाच्या खाईत पुरते बुडाले आहेत. राज्यावर ४ लाख ७१ हजार ६४२ कोटी रुपये कर्ज असून गेल्या एकाच वर्षात त्यात तब्बल ५७ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आर्थिक आघाडीवर राज्याची पिछेहाट झालेली असून दरडोई उत्पन्नाच्या बाबतीतही महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडलेल्या आर्थिक पाहणी अहवालात या बाबी स्पष्ट झाल्या आहेत.

 महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा वाढत असल्याने नव्यानेच सत्तारूढ झालेल्या महाविकास आघाडीसमोर राज्याची आर्थिक घडी बसवण्याचे मोठे आव्हान आहे. राज्याची महसुली तूट तब्बल २० हजार २९३ कोटी रुपये आहे. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीतही महाराष्ट्र पिछाडीवर गेला आहे. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न १ लाख ९१ हजार ७३६ रुपये आहे. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत हरियाणा देशात पहिल्या क्रमांकावर असून हरियाणाचे दरडोई उत्पन्न २ लाख २६ हजार ६४४ रुपये आहे. त्या खालोखाल कर्नाटक, तेलंगण, तामिळनाडू या राज्यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे.

 मागच्या एकाच वर्षात राज्यावरील कर्जाच्या बोजात मोठी वाढ झाली आहे. २०१८-१९ मध्ये महाराष्ट्रावर ४ लाख १४ हजार कोटी रुपये कर्ज होते. त्यात एकाच वर्षात जवळपास ५७ हजार कोटींची वाढ झाली आहे. या वर्षी वित्त विभागाने २४ हजार ७१९ कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. असे असले तरी सर्व विभागांना अर्थसंकल्पात पुरेसा निधी दिला जाईल, अशी हमी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच दिली होती. राज्याची आर्थिक घडी नीट बसवून राज्याची पिछेहाट रोखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा