शिवसेनेचा भाजपला टोला : ज्याच्याकडे 145 बहुमताचा आकडा, तो कोणीही नेता मुख्यमंत्री !

0
246
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : पुन्हा एकदा राज्यात महायुतीचेच सरकार येणार ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका स्वागतार्ह आहे. परंतु सगळे काही ‘ठरल्या’प्रमाणे झाले तरच राज्यात महायुतीचे सरकार येईल. ज्याच्याकडे 145 हा बहुमताचा आकडा आहे, असा कोणताही नेता किंवा आमदार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो. महाराष्ट्राची कुंडली आम्हीच तयार करणार आहोत. या कुंडलीत कोणते ग्रह कुठे बसावयाचे, कोणते तारे जमिनीवर उतरवायचे आणि कोणते तारे चमकवायचे हे शिवसेनाच ठरवणार आहे, अशी तुफान टोलेबाजी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महायुतीचेच सरकार येणार आणि महायुती राज्याला पाच वर्षे स्थिर सरकार देणार, असे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी जोरदार टोलेबाजी केली. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष सोबत राहाण्यातच महाराष्ट्राचे हित आहे. सगळे काही ‘ठरल्याप्रमाणे’ झाले तरच राज्याला निश्‍चितच पाच वर्षे स्थिर सरकार मिळेल. आम्ही ‘मुख्यमंत्रिपद ’आणि ‘ठरल्या’प्रमाणे यावर बोलत आहोत. व्यक्ती महत्वाची नाही तर महाराष्ट्र महत्वाचा आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपाल एखाद्या पक्षाला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देतीलही. परंतु त्यांनाही बहुमत सिद्ध करावेच लागेल, असे राऊत म्हणाले.

शिवसेनेला कोणतीही घाई नाही. सध्या विधिमंडळ पक्षाच्या बैठका सुरू आहेत. त्या संपू द्या. शांतपणे आणि थंड डोक्याने महाराष्ट्राच्या हिताचा विचार करूनच आता पुढील निर्णय घ्यावे लागणार आहेत. पण महाराष्ट्राची कुंडली शिवसेनाच लिहिणार आहे, असे सांगत संजय राऊत यांनी शिवसेनाच सरकार स्थापनेच्या प्रक्रियेत किंगमेकरच्या भूमिकेत राहाणार असल्याचे संकेत पुन्हा एकदा दिले आहेत.

भाजपचे ६० आमदार आमच्याही संपर्कात

शिवसेनेचे 23 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजप नेत्याने केला होता. शिवसेनेचे आमदार संपर्कात आहेत, असे कुणी म्हणत असेल तर मी सुद्धा भाजपचे साठएक आमदार सकाळपासून आमच्याशी संपर्क साधत आहेत, असे म्हणू शकतो, असे राऊत म्हणाले.युतीत रहाण्यातच महाराष्ट्राचे भले आहे. पण तो सन्मान राखला जायला हवा, असेही राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा