महाशिवआघाडीकडे 156 आमदारांचे संख्याबळ, तरीही भाजपचे पुन्हा पुन्हा ‘आमचेच सरकार’चे दावे

0
201
संग्रहित छायाचित्र.

कौशल दीपांकर/मुंबई

अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ देण्यास नकार दिल्यामुळे भाजपशी फारकत घेतलेल्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाशिवआघाडी करून संयुक्त सरकार स्थापन करण्याची तयारी चालवली आहे. नव्या आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा मसुदाही तयार झाला आहे. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत या नव्या आघाडीकडे 156 सदस्यांचे भक्कम बहुमत असतानाही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांसह सर्वच नेते पुन्हा पुन्हा भाजपचेच सरकार येणार असल्याचे दावे करू लागले आहेत. आजही चंद्रकांत पाटलांनी महाराष्ट्रात भाजपचेच सरकार येणार, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला असल्याचा पुनरूच्चार केला आहे. त्यामुळे या दाव्यामागे नेमके गौडबंगाल काय, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे. भाजपच्या या भूमिकेवर शिवसेनेने थेट शरसंधान साधत राष्ट्रपती राजवटीआडून घोडेबाजार भरवण्याचे हे भाजपचे मनसुबे आहेत, असा घणाघाती हल्ला चढवला.

288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत शिवसेना (56), राष्ट्रवादी काँग्रेस (54) आणि काँग्रेस (44) असे 154 आमदारांचे भक्कम संख्याबळ आहे. शिवाय दोन अपक्ष आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला असल्यामुळे हे संख्याबळ 156 वर पोहोचले आहे. बहुमतासाठी 145 आमदारांचे संख्याबळ पुरेसे असताना नव्या महाशिवआघाडीकडे बहुमतापेक्षा 11 आमदारांचे संख्याबळ जास्त आहे. याउलट भाजपकडे 105 आमदारांचे संख्याबळ असून 14 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा भाजपचा दावा आहे. तो ग्राह्य धरला तरी हे संख्याबळ 119 वरच येऊन आडते. काठावरच्या बहुमतासाठी भाजपला आणखी तब्बल 26 आमदारांची आवश्यकता आहे. तरीही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजप नेते राज्यात भाजपशिवाय अन्य कुणाचेही सरकार येणार नाही, असे दावे छातीठोकपणे करू लागल्यामुळे या दाव्यांमागे नेमके गौडबंगाल काय, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. काही जण या दाव्याची खिल्ली उडवत आहेत. तर काही जण हा नियोजित आघाडीचा विचका करण्याच्या भाजपच्या नियोजनबद्ध मोहिमेचा भाग असल्याचे सांगू लागले आहेत. शनिवारी मुंबईत भाजपच्या पराभूत उमेदवारांची बैठक झाली. या बैठकीनंतरही चंद्रकांत पाटील यांनी राज्यात भाजपचेच सरकार येणार, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. आम्हाला घेतल्याशिवाय कुणीही सत्तेत येऊच शकत नाही, असे सांगितले. या आधी फडणवीस आणि शुक्रवारी पाटलांनाही असेच वक्तव्य केले होते.

 दाव्यांमुळे भाजपवर संशयाची सुई: भाजपकडून पुन्हा पुन्हा केल्या जात असलेल्या ‘आमचेच सरकार’च्या दाव्याचा शिवसेनेने ‘सामना’तून खरपूस समाचार ही घेतला आहे. सरकार स्थापन करण्यास आम्ही असमर्थ आहोत असे सांगणारे राष्ट्रपती राजवट लागू होताच ‘आता सरकार फक्त आमचेच बरे का!’ हे कोण्या तोंडाने सांगत आहेत? यातून राष्ट्रपती राजवटीच्या आड घोडेबाजार भरवण्याचे मनसुबे उघड झाले आहेत. पुन्हा आमचेच सरकार अशा किंकाळ्यांमुळे महाराष्ट्राच्या कानाचे पडदे फाटत आहेत. अशाने जनतेचे कान बधीर होतील, पण किंकाळ्या मारणार्‍यांचे मानसिक संतुलन बिघेडल का? याची आम्हाला चिंता वाटते, अशी खरमरीत टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून केली आहे. तरीही पुन्हा पुन्हा भाजपकडून आमचेच सरकारचे दावे केले जात आहेत. 119 सदस्यांचे संख्याबळ सरकार स्थापण्यासाठी पुरेसे नसताना हे दावे केले जात असल्यामुळे भाजपकडे काहीशा शंकेच्या नजरेनेही पाहिले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा