फडणवीसांच्या नेतृत्वातच सरकारवर भाजप, तर ‘जे ठरले ते लेखी द्या’च्या मागणीवर शिवसेना ठाम

1
96
संग्रहित छायाचित्र .

मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली महायुतीचेच सरकार येणार असे सांगत भाजप स्वतःकडेच मुख्यमंत्रिपद ठेवण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. दुसरीकडे भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत जे ठरले होते, त्याचा तुम्हीच लेखी प्रस्ताव द्या, मगच चर्चा करू, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्यामुळे राज्यात 12 दिवसांपासून निर्माण झालेला सत्तावाटपचा तिढा कायम आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेकडून सत्ता स्थापनेबाबतचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आला नाही. आम्ही त्यांच्या प्रस्तावाची वाट पाहत आहोत. प्रस्तावासाठी शिवसेनेला भाजपची दारे 24 तास खुली आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. मात्र, देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही त्याला मंजुरी दिली आहे. संपूर्ण भाजप फडणवीसांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. त्यांच्यात नेतृत्वाखाली राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

जे ठरले त्यासाठी वेगळ्या प्रस्तावाची काय गरज? : शिवसेना

भाजपची ही भूमिका आल्यानंतर शिवसेनेनेही आपली भूमिका मांडली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत जे ठरले, तेच झाले पाहिजे. त्याचा लेखी प्रस्ताव भाजपने आम्हाला दिला तरच आम्ही चर्चा करू. जे ठरले त्यासाठी शिवसेनेने वेगळा प्रस्ताव देण्याची गरजच काय, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

 आधीच समंजसपणा दाखवला असता तर वाद झालाच नसता  भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद घेण्यावर चर्चा होऊ शकते, असे वक्तव्य केले आहे. अशी समंजसपणाची भूमिका भाजपने आधीच घेतली असती तर एवढा वाद झालाच नसता, असे सांगतानाच संजय राऊत यांनी शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आला नाही, असे कसे म्हणता? अमित शाह यांच्या उपस्थितीत जे ठरले, तोच शिवसेनेचा प्रस्ताव होता. हाच प्रस्ताव भाजपने लेखी स्वरुपात द्यावा, मगच चर्चा होईल, असे भाजपला ठणकावले. त्यामुळे आता शिवसेना- भाजप युती चर्चेला बसणार की दोघेही नवा भिडू शोधून सरकार स्थापनेची कसरत करणार, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंचा भाजपला दे धक्का : सरकारही शिवसेनेचे आणि मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच!

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा