विधिमंडळ पक्ष नेते फडणवीसांना टाळून भाजप नेते घेणार राज्यपालांची भेट, सरकार स्थापनेचा दावा करण्याची शक्यता कमीच!

0
272
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : राज्यात सरकार महायुतीचेच होणार असा दावा भाजप नेत्यांकडून वारंवार केला जात असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार हे गुरूवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. आम्ही दोघेच राज्यपालांची भेट घेणार असल्याचे मुनगंटीवार यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाजप नेत्यांच्या या राज्यपाल भेटीत भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नसतील. त्यामुळे भाजप नेत्यांच्या राज्यपाल भेटीत सरकार स्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यताही कमीच आहे.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बुधवारी झाली. या बैठकीतच चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी जाईल, असा निर्णय घेण्यात आला. या शिष्टमंडळात चंद्रकांत पाटलांसोबत सुधीर मुनगंटीवार यांचाही समावेश आहे. आम्ही दोघे राज्यपालांना भेटणार आहोत, असे स्वतः मुनगंटीवार यांनीच सांगितल्यामुळे या शिष्टमंडळात भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा समावेश असणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

 घटनात्मक संकेतांनुसार, विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या नेतृत्वातील शिष्टमंडळच राज्यपालांच्या भेटीला जाते आणि विधिमंडळ पक्षाचा नेताच राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करत असतो. परंतु गुरूवारी राज्यपालांकडे जात असलेल्या भाजपच्या शिष्टमंडळात भाजप विधिमंडळ पक्षाचे नेतेच नसल्यामुळे ही भेट केवळ अनौपचारिक ठरेल आणि भाजपचे नेते राज्यपालांना राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती देतील, अशी शक्यता आहे. विशेष म्हणजे यापूर्वी शिवसेना आणि काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तब्बल चौदाव्या दिवशी भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांकडे जात आहे. त्याही शिष्टमंडळात भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता नसणार असल्याने राजकीय घडामोडींवर चर्चेनेच राज्यपाल आणि भाजप नेत्यांच्या भेटीची सांगता होणार आहे. त्यामुळे भाजपकडून गुरूवारी सरकार स्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यताही कमीच आहे.

हेही वाचा: तीन दिवसांत कोणत्याही पक्षाने दावा केला नाही तर सरकार स्थापनेची सूत्रे जाणार राज्यपालांच्या हाती!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा