सरकार स्थापनेचा दावा करण्यास भाजपचा नकार, आता लक्ष राज्यपालांच्या निर्णयाकडे!

0
87
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : आम्ही सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहोत. त्यामुळे आम्ही सरकार स्थापण्याचा दावा करणार नाही. शिवसेना महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अवमान करत आहे. शिवसेनेला आमच्यासोबत यायचे नाही, असे सांगत भाजपने राज्यात सरकार स्थापन करण्यास नकार दिला आहे. 105 जागा जिंकून सर्वात मोठा ठरलेल्या भाजपच्या नकारानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सरकार स्थापण्यासाठी निमंत्रित करतात की अन्य पर्यायांची चाचपणी करतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

राज्यपाल कोश्यारी यांनी शनिवारी सायंकाळी भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले होते. शिवाय 11 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची अटही घातली होती. राज्यपालांच्या या निमंत्रणाच्या पार्श्वभूमीवर आज रविवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. अर्धातास चाललेल्या या बैठकीतच सरकार स्थापनेचा दावा न करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, विनोद तावडे, पंकजा मुंडे व अन्य नेत्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांना आपला निर्णय कळवला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना भाजप सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहे. आम्ही सरकार स्थापनेचा दावा करणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. विशेष म्हणजे या शिष्टमंडळात भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस नव्हते. राज्यपालांनी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून फडणवीसांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, ते निमंत्रण स्वीकारून मी सरकार स्थापन करणार नाही, हे राज्यपालांना कळवायला स्वतः फडणवीस गेले नव्हते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा