मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा; शिवसेनेशी काडीमोडाचे संकेत देत म्हणाले, महाराष्ट्रात पुढचे सरकार भाजपचेच!

0
244

मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राजीनामा दिला. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत आपण काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकार स्थापन करताना भाजप घोडेबाजार करणार नाही, असे सांगतानाच फडणवीसांनी पुढचे सरकार भाजपच स्थापन करेल, असा विश्‍वासही व्यक्त केला. शिवसेना- भाजपमध्ये अडीच- अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचे कधीच ठरले नव्हते. मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अनेकदा फोन केले, पण ते त्यांनी घेतले नाही. चर्चेसाठी भाजपची दारे 24 तास खुली होती, पण शिवसेनेनेच चर्चेची दारे बंद केली, असे फडणवीस म्हणाले.

राज्यात सरकार स्थापन करण्यास कोणामुळे विलंब झाला, हे सगळ्यांनाच माहीत आहे. शिवसेनेचे काही गैरसमज झाले असतील तर ते चर्चेतून दूर करता आले असते. परंतु भाजपशी चर्चा करायची नाही आणि काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसशी रोज चर्चा करायची, असे धोरण शिवसेनेने अवलंबले. केंद्रात आणि राज्यात सत्तेत  रहायचे आणि जगाने नेतृत्व मान्य केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खालच्या भाषेत टीका करायची, हे आम्ही सहन करणार नाही. सोबत राहणार असू आणि मोदींबद्दल टीका सुरूच राहणार असेल तर असे सरकार कशाला चालवायचे? असा सवाल करत शिवसेनेला डावलून भाजप पुढील सरकार स्थापन करणार असल्याचे संकेतच फडणवीसांनी देऊन टाकले.

आम्ही राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होईल, असे सांगत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र सरकार स्थापनेचे सर्व पर्याय खुले असल्याचे वक्तव्य केले. ते धक्कादायक होते. भाजपकडून आमदार फोडाफोडीचे प्रयत्न झाल्याचे आरोप झाले. पण तसे पुरावे द्या, अन्यथा माफी मागा, असे माझे त्यांना खुले आव्हान आहे. सरकार स्थापन करताना भाजप घोडेबाजार करणार नाही,असे फडणवीस म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा