Exclusive: पाठिंब्यास काँग्रेस- राष्ट्रवादी अनुकूल, 5.30 वाजेपर्यंत ‘शिवसेनेचे सरकार’ची घोषणा?

1
318
संग्रहित छायाचित्र.

कौशल दीपांकर/ नवी दिल्ली.मुंबई

  महाराष्ट्रातील सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्याच्या पहिल्या प्रयत्नाला यश आल्यानंतर राज्यात पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यास दोन्ही काँग्रेस अनुकूल असून शिवसेनेकडून पाठिंब्याची अधिकृत मागणी झाल्यानंतर आज साडेपाच वाजेपर्यंत महाराष्ट्रात ‘शिवसेनेचे सरकार’ची घोषणा होण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासूनच भाजपला महाराष्ट्रातील सत्तेपासून दूर ठेवण्याच्या मुद्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांच्या संपर्कात होते. मात्र भाजपला बेसावध ठेवण्यासाठी आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल मिळाला आहे, भाजप- शिवसेनेनेच सरकार स्थापन करावे, अशी भूमिका दोन्ही काँग्रेस माध्यमांसमोर मांडत आल्या आहेत. तर सत्तेत समान वाटा आणि अडिच- अडिच वर्षे मुख्यमंत्रिपदावर शिवसेना अडून बसली होती. त्यामुळे 105 आमदारांचे संख्याबळ असूनही भाजपसाठी विचित्र परिस्थिती निर्माण करण्यात आली आणि आम्ही सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहोत, असे भाजपला राज्यपालांना कळवावे लागले. हा सर्व भाजपला महाराष्ट्रातील सत्तेपासून दूर ठेवण्याच्या रणनीतीचाच भाग होता. त्या रणनीतीचा पहिला प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर आता पर्यायी सरकार स्थापनेचा दुसरा भाग सुरू झाला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांवर बैठका होऊन त्यात ही रणनीती आखण्यात आली. शिवसेना नेते संजय राऊत एकटेच शरद पवारांच्या भेटीला वारंवार जाऊन या रणनीतीच्या आखणीत योगदान देत होते, असे सूत्रांनी सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सरकार स्थापनेचा अधिकृत प्रस्ताव आल्यानंतर दोन्ही काँग्रेस सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा जाहीर करतील. शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत सहभागी व्हायचे आणि काँग्रेसने या सरकारला बाहेरून पाठिंबा द्यायचा, असे ठरलेले आहे. मात्र काँग्रेसमधील एक गट काँग्रेसनेही सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी आग्रही आहे. त्यामुळे त्याबाबत काँग्रेसचा आज 4 वाजताच्या बैठकीत निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले. आज साडेपाच वाजेपर्यंतच हे सर्वचित्र स्पष्ट होईल आणि सायंकाळपर्यंत शिवसेना सरकार स्थापनेचा दावा करेल, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

सरकार स्थापनेची शिवसेनेची संधी हुकली तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि भाजपला आमदारांची फोडाफोडी करण्यासाठी सहा महिन्यांचा वेळ मिळेल, ही परिस्थिती उद्भवू नये, म्हणून दोन्ही काँग्रेस काळजीपूर्वक पावले टाकत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा