शिवसेनेचे सरकार? : काँग्रेसचा निर्णय सायंकाळी 4 वाजता, महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्लीत बोलावले!

0
97
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्ली/ मुंबई : महाराष्ट्रात सरकार स्थापनेवरून राजधानी नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेली काँग्रेस नेत्यांची बैठक संपली असून महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. सायंकाळी 4 वाजता या नेत्यांसोबतच्या बैठकीत चर्चा करून काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, याबाबत अंतिम निर्णय जाहीर करणार आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सरकार स्थापनेचे निमंत्रण देऊन आज सायंकाळी 7.30 वाजेपर्यंतची मुदत दिल्यामुळे नवी दिल्ली, मुंबई आणि जयपूरमध्ये वेगाने घडामोडी घडत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खारगे आणि अहमद पटेल यांच्यासह काही प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घ्यावा, असे या बैठकीत ठरल्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना दिल्लीला पाचारण करण्यात आले आहे. हे नेते दिल्लीत पोहोचल्यानंतर आज 4 वाजता काँग्रेसची बैठक होईल आणि त्यानंतर पाठिंब्याबाबत अंतिम निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले.

 अरविंद सावंत यांचा राजीनामा

शिवसेनेने आधी केंद्र आणि राज्यातील भाजपसोबतची युती तोडावी, सरकारमधून बाहेर पडावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यांनी रविवारी सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मोदी सरकारमधील मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शिवसेना भाजपच्या नेतृत्वातील एनडीएमधून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत आहे, असे संकेत या राजीनाम्यातून मिळत आहेत.

सुशीलकुमार शिंदे जयपूरमध्ये

शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, याबाबत काँग्रेस आमदारांशी चर्चा करण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे ते तातडीने जयपूरमध्ये दाखल झाले आहेत. आमदारांशी चर्चा करून ते दिल्लीला जाऊन अहवाल देतील, असे सूत्रांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा