भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी राजकीय वैर विसरून काँग्रेस देणार शिवसेनेला पाठिंबा?

0
558
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू असत नाही, ही म्हण महाराष्ट्राच्या राजकारणात खरी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपला महाराष्ट्रातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राजकीय वैर बाजूला ठेवून काँग्रेसने शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पाठिंब्याबाबत शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास तो प्रस्ताव घेऊन आम्ही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे जाऊ, असे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजप वगळून शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस असे नवीन समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात आकाराला येण्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत 105 जागा जिंकून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमतासाठी लागणारा 145 आमदारांचा आकडा त्यांच्याकडे नाही. त्यामुळे सरकार स्थापन करण्यात भाजप अपयशी ठरला तर दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपाल शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देऊ शकतात. शिवसेनेने सरकार स्थापण्यासाठी पुढाकार घेतला आणि काँग्रेसकडे पाठिंब्याचा प्रस्ताव दिला तर त्या प्रस्तावावर आम्ही नक्कीच विचार करू, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. मात्र या प्रस्तावावर काँग्रेस पक्षश्रेष्ठीच अंतिम निर्णय घेतील, असेही चव्हाण म्हणाले.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सध्या तरी आम्ही विरोधात बसण्याच्या तयारीत आहोत. मात्र परिस्थिती बदलली तर त्यावेळी निर्णय घेऊ, असे सांगत शिवसेनेला पाठिंब्याचे संकेत दिले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा