महत्वाची खाती स्वतःकडेच ठेवून भाजपची शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद, 13 मंत्रिपदांची ऑफर

0
291
संग्रहित छायाचित्र .

मुंबई : अडीच- अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समान वाटा या मागणीवर निवडणुकीचे निकाल लागल्यापासून अडून बसलेल्या शिवसेनेसमोर भाजपने सत्तावाटपाचा नवा फॉर्म्युला ठेवला आहे. गृह, अर्थ, महसूल, नगरविकास यासारखी महत्वाची खाती स्वतःकडेच ठेवून भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह 13 मंत्रिपदे देऊ केली असल्याचे सांगण्यात येते.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठरलेल्या सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्याची यावेळी अंमलबजावणी झाली पाहिजे. असा शिवसेनेचा आग्रह आहे. मात्र समान सत्तावाटप किंवा अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचा कुठलाही फॉर्म्युला ठरलेलाच नव्हता, असा भाजपचा दावा आहे. त्यामुळे उभय पक्षांतील सत्तावाटपाची बोलणी अडखळलेली आहे. अशातच भाजपने शिवसेनेसमोर हा सत्तावाटपाचा नवा फॉर्म्युला ठेवला आहे.

 यंदाच्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सरकार स्थापन करण्याचे भाजपचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. भाजपने 105 जागा जिंकल्या आहेत. त्यांना 5 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिल्याने हे संख्याबळ 110 वर पोहोचले असले तरी शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय भाजपला सरकार स्थापन करणे अशक्य आहे. तरीही भाजपच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन करणार असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार आहेत. त्यातच अडून बसलेल्या शिवसेनेवर दबाव वाढवण्यासाठी शिवसेनेचे 15 ते 16 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या बातम्याही पेरण्यात येत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दूरध्वनीवर चर्चा झाल्याची बातमीही पेरण्यात आली आहे. असे असले तरी शिवसेना अद्याप आपल्या मागण्यांवर ठाम असल्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी पुढाकार घेत भाजपने हा नवा प्रस्ताव ठेवल्याचे कळते. या प्रस्तावाला आता शिवसेनेकडून कसा प्रतिसाद दिला जातो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा