धनंजय मुंडेंची ‘ती’ क्लिप छेडछाड करून व्हायरल केली, भाजपच्या सोशल मीडिया टीमविरुद्ध गुन्हा

3
11720
संग्रहित छायाचित्र.

परळीः परळी विधानसभा मतदारसंघातील व्हायरल क्लिप प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. भाजपच्या सोशल मिडीया टीमने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या मूळ भाषणाशी छेडछाड करून तयार केली आणि व्हायरल केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी परळी पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शनिवारी निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावत असतानाच भाजपच्या उमेदवार आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल धनंजय मुंडे हे अत्यंत आक्षेपार्ह भाषेत बोलत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. त्याचाच त्रास होऊन प्रचाराच्या समारोपाच्या सभेत पंकजा मुंडे यांना भोवळ आल्याचे सांगत भाजप कार्यकर्त्यांनी झुंडीने पोलिस ठाण्यात जाऊन धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. त्यामुळे परळीतील वातावरण चांगलेच पेटले होते. या सगळ्या प्रकाराच्या पार्श्‍वभूमीवर आपण असे बोललोच नाही, अशी क्लिप व्हायरल करताना किमान बहीण-भावाच्या नात्याचे तरी पवित्र्य राखा, असा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला होता.

पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा गुन्हा परळी पोलिसांनी नोंदवल्यानंतर धनंजय मुंडे यांनीही शनिवारी रात्री उशिरा परळी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. धनंजय मुंडे यांचे मूळ वक्तव्य संपादित करून त्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने ही व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्यात आली आहे. ही क्लिप धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीवर परिणाम करणारी असून तत्काळ गुन्हा नोंदवून कारवाईची मागणी या फिर्यादीत करण्यात आली होती. भाजपच्या तक्रारीवर धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध लगेच गुन्हा नोंदवणार्‍या परळी पोलिसांनी धनंजय मुंडेंच्या तक्रारीवर मात्र रविवारी सायंकाळच्या सुमारास गुन्हा दाखल केला.परळी शहर पोलिसांनी भाजप सोशल मीडिया टीम विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 469, 34 व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66(क) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

आरोप सिद्ध झाले तर माझे जीवन संपवतो : धनंजय मुंडे

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन या विषयाचा खुलासा केला आहे. ती व्हायरल क्लिप मूळ भाषण संकलित करत जाणीवपूर्वक दोन दिवस उशिरा पसरवली आहे; भाजपकडून काही ठराविक लोकांकडून मला राजकारणातून संपवण्याचा हा डाव आहे. अगोदरच दोन्ही मुंडे परिवारातील संबंध ताणलेले असताना अशा गोष्टी जाणीवपूर्वक पसरवल्या असून आपण या प्रकरणाच्या मूळापर्यंत जाणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. पंकजांविरुद्ध ‘तसे ‘ बोलल्याचं आरोप सिद्ध झाल्यास मी माझे जीवन संपवून टाकतो, असेही मुंडे म्हणाले. या सर्व घडामोडीनंतर आता प्रशासन भाजप सोशल मीडिया टीमविरुद्ध कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

3 प्रतिक्रिया

  1. निवडणुक पद्धतीत अनिवार्य बदल करणं आवश्यक आहे. कार्यकर्ते ही संकल्पना मोडीत काढायला हवी. सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमे यांचा वापर करण्यास प्रत्येक उमेदवाराला आणि पक्षाला वाव ध्यावा. रॅली ,सभा , प्रचारफेरी ,भोंगे सगळं बंद व्हायला हवे. निवडून आलेल्यांना पैसे लाटायला वाव मिळाला नाही तरी बाकी सगळं आपोआप थांबेल.

  2. शिवसेना भाजपाला नाही सोडणार भले उपमुख्यमंत्री पद जरी भेटले तरी पदरात पाडून घेतील पण संसार भाजपासोबतच मांडतील.
    नवीन गडी नवीन डाव या भानगडीत सेनाप्रमुख पडणार नाहीत आणि पवारनितीशी समीकरण जुळवणे जरा कठिणच वाटते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा