सरकार स्थापनेसाठी राज्यपालांचे फडणवीसांना निमंत्रण,सोमवारपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची अट

0
520
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून जवळपास पंधरवडा उलटत असताना 105 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने स्वतःहोऊन सरकार स्थापनेचा दावा केला नसल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घटनात्मक प्रक्रिया सुरू करून भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. हे निमंत्रण देतानाच 11 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत बहुमत सिद्ध करण्यासही सांगितले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस राज्यपालांचे हे निमंत्रण स्वीकारणार की नाही, याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, राज्यपालांच्या निमंत्रणानंतर भाजपने रविवारी कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. या बैठकीतच सरकार स्थापन करायचे की नाही याबाबत विचारविमर्श करून निर्णय घेतला जाणार आहे, असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 105 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्या खालोखाल 56 जागा जिंकून शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपने सरकार स्थापन करण्यास राज्यपालांकडे असमर्थता कळवल्यास घटनात्मक प्रक्रियेनुसार दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांना शिवसेनेलाच सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करावे लागणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस राज्यपालांचे निमंत्रण स्वीकारून सरकार स्थापनेची संधी घेणार का? आणि बहुमताच्या अग्निपरीक्षेला सामोरे जाणार का?, याचीच राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागली आहे.

 फडणवीस यांनी विधानसभेची मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला होता. राज्यात पर्यायी व्यवस्था होईपर्यंत राज्यपालांनी त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहाण्यास सांगितले आहे.आजच्या घडीला भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी आणखी 39 आमदारांची आवश्यकता आहे. म्हणजेच सध्या तरी भाजप बहुमतापासून कोसो दूर आहे.

बहुमत सिद्ध करण्यासाठी अवघे दोनच दिवस हाती

राज्यपालांनी फडणवीसांना बहुमत सिद्ध करण्यासाठी कमी वेळ दिला आहे. त्यांनी उद्या रविवारी सरकार स्थापन केलेच तर बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांच्या हातात फक्त दोनच दिवसांचा मिळणार आहे. त्यामुळे एवढ्या कमी वेळात बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान फडणवीस स्वीकारणार काय?, हाच कळीचा प्रश्‍न आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकार स्थापनेसाठी घोडेबाजार करणार नाही, असे आश्‍वासन देतानाच पुढचे सरकार भाजपचेच असेल, असा विश्वासही व्यक्त केला आहे. त्यामुळे ते नेमकी कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा