शिवसेनेची संधी हुकली, आता राष्ट्रवादीला राज्यपालांचे निमंत्रण

1
87
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा पेच सोमवारी सायंकाळी सुटेल, असे वाटत असतानाच युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन दिलेल्या मुदतीत सरकार स्थापनेचा दावा केला. सत्ता स्थापनेसाठी आमची दोन पक्षांशी बोलणी सुरू असून आम्हाला सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला वेळ वाढवून द्यावा, अशी विनंती शिवसेनेने राज्यपालांना केली मात्र, राज्यपालांनी शिवसेनेला वेळ वाढवून देण्यास नकार दिला. त्याचबरोबर शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा दावाही फेटाळून लावला नाही. राज्यपालांनी सर्वात मोठा तिसरा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापनेचा दावा करते की नाही, यावरच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार की नाही, हे ठरणार आहे.

 शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिवसभर बैठका सुरू होत्या. पण त्या बैठकांत वेळेत निर्णय न झाल्यामुळे शिवसेनेच्या हातून सत्ता स्थापनेची वेळ निसटून गेली. दिवसभरातील वेगवान घडामोडींनंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे, शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचं आमंत्रण देतानाच सोमवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत त्यावर प्रतिसाद देण्यास सांगितले होते. त्यानुसार पावणेसात वाजताच्या सुमारास शिवसेना नेते राज्यपालांकडे पोहचले. शिवसेनेने राज्यपालांकडे आपल्या आमदारांचं सह्यांचं पत्र सादर केलं व सत्तेवर दावा सांगितला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यांच पत्र देण्यासाठी शिवसेनेने 48 तासांचा वेळ वाढवून मागितला. मात्र, राज्यपालांनी हा वेळ वाढवून दिला नाही. त्याऐवजी राज्यपालांनी तिसर्‍या क्रमांकाचा मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा