मुंबई: 105 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने सरकार स्थापन करण्यास असमर्थता कळवल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेनेला सरकार स्थापण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यासाठी राज्यपालांनी शिवसेनेला उद्या, सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतच मुदत दिली आहे. त्यामुळे शिवसेनेला अल्पावधीतच आकड्यांची जुळवाजुळव करून राज्यपालांना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत होकार किंवा नकार कळवावा लागणार आहे.
राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रित केल्यामुळे मुंबईत वेगाने राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा हवा असेल तर शिवसेनेने आधी केंद्रात आणि राज्यातही भाजपशी युती तोडावी आणि सरकार स्थापनेबाबतचा प्रस्ताव द्यावा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. दुसरीकडे काँग्रेसने शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. काँग्रेस आमदार सध्या जयपूरमध्ये असूनही तेही शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.