मुंबई : शिवसेनेने ठरवले तर आपले सरकार बनवू शकते आणि बहुमतासाठी आवश्यक आकडाही जमवू शकते, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे कालच राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्या भेटीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा नव्या राजकीय समीकरणाची चर्चा रंगली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या अर्थी मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार, असे म्हटले आहे, त्या अर्थी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे मी तुम्हाला लिहून देतो, असे राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. महाराष्ट्राच्या जनतेने फिफ्टी- फिफ्टी फॉर्म्युल्यावर सरकार स्थापनेसाठी कौल दिला आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेचा भाजपचा अधिकार आहे. त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा करावा आणि बहुमत सिद्ध करावे, असे सांगतानाच ज्यांच्याकडे बहुमताचा आकडा नाही, त्यांनी सरकार स्थापनेचे धाडस करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
शरद पवार यांच्या भेटीसंदर्भात विचारले असता, शरद पवार हे देशाचे अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा होत असतो. या भेटीत राजकारण शोधू नका, असे स्पष्टीकरणही राऊत यांनी दिले आहे. मात्र राज्यात शिवसेना- भाजप युतीत सत्तावाटपावरून पेच निर्माण झालेला असताना राऊत पवारांच्या भेटीला गेल्यामुळे या भेटीचे राजकीय अर्थ काढण्यात येत आहेत.