शरद पवार पुन्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी, राज्यपालांच्या निर्णयानंतरच आघाडीची भूमिका

0
401
कार्टून सौजन्य : सतीश आचार्य यांच्या www.cartoonistsatish.com वरून साभार.

मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप- प्रत्यारोप केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्र बिंदू पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सरकला आहे. मुंबईच्या पेडररोडवरील सिल्व्हर ओक हे पवारांचे निवासस्थानच आता राजकीय घडामोडींचे मुख्य केंद्र बनले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप सध्याच सरकार स्थापनेचा दावा करणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यातच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. आपण अनेकदा फोन करूनही त्यांनी ते घेतले नाहीत, असे फडणवीस म्हणाले. त्यावरून उद्धव ठाकरे प्रचंड संतापले. ठाकरे कुटुंबाला खोटारडे ठरवण्याचा हा प्रकार आहे. ठाकरे घराण्यावर पहिल्यांदा कुणी तरी खोटारडेपणाचा आरोप केला. महाराष्ट्रातील जनतेला खरे बोलणारे हवेत की खोटे बोलणारे असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे भाजप- शिवसेना यांच्यातील दरी आणखीच रुंदावली आहे. ही दरी नजीकच्या काळात सांधली जाण्याची शक्यता कमी दिसत असल्याने शुक्रवारी सायंकाळपासूनच शरद पवार यांच्या निवासस्थानी राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. फडणवीसांच्या पत्रकार  परिषदेनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगेच शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचीही पवारांच्या निवासस्थानी बैठक झाली.

सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सरकार स्थापनेचा दावाच केलेला नसल्यामुळे आता राज्यपाल काय भूमिका घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतही राज्यपालांच्या भूमिकेनंतरच आपली पुढील भूमिका घेण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला असला तरी आता राज्यपाल काय भूमिका घेतात, याकडे आमचे लक्ष आहे. राज्यपालांच्या निर्णयानंतरच आम्ही भूमिका घेऊ, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे पत्ते झाकूनच ठेवले. महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय परिस्थिती निर्माण झाली. शरद पवार यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्याशी राजकीय परिस्थितीवर चर्चा केली, असे थोरात म्हणाले. आता राज्यपालांनी घटनेनुसार प्रक्रिया राबवावी, असेही थोरात म्हणाले. राज्यात सरकार कोणाचे येणार, हे राज्यपाल जे काही ठरवतील त्यानंतरच स्पष्ट होईल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

 राज्यातील एकूणच राजकीय घडामोडी पाहाता शरद पवार हेच आता राज्याच्या राजकारणाचे प्रमुख केंद्र बनले असून आता पवार ठरवतील ती रणनिती आणि धोरणानुसारच आगामी राजकारणाची दिशा निश्‍चित होण्याचे संकेत मिळत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा