ना शिवसेनेकडून प्रस्ताव आला, ना उद्धव ठाकरेंशी बोलणे झाले: शरद पवार, पण जयंत पाटील म्हणतात सरकार शिवसेनेचेच येणार!

1
241
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्ली/मुंबईः महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत शिवसेनेकडून आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही किंवा त्यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणेही झालेले नाही, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेकडून प्रस्ताव आल्याशिवाय पुढे जाणार कसे?, असा सवाल करून शरद पवार यांनी राज्यातील सरकार स्थापनेबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. उद्या मंगळवारी आपण सोनिया गांधी यांची पुन्हा भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, शरद पवारांनी दिल्लीत हे सांगण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी  मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राज्यात सरकार भाजपचे नव्हे तर शिवसेनेचेच येणार असा दावा केल्यामुळे  राज्यातील सरकार स्थापनेचा गोंधळ आणखीच वाढला आहे. या दोन नेत्यांच्या विधानांमुळे राज्यात सरकार महायुतीचे येणार की नव्या आघाडीचे येणार, अशा चर्चेला तोंड फुटले आहे.

 शरद पवार यांनी सोमवारी नवी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत आपण त्यांना राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा दिल्याचे शरद पवार म्हणाले. आमच्याकडे सरकार स्थापनेइतके संख्याबळ नाही. भाजप- शिवसेना महायुतीकडे आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे संख्याबळ आहे, सरकार स्थापन करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे, असे सांगतानाच पण भविष्यात काय घडेल, हे सांगू शकत नाही, हे सांगायलाही पवार विसरले नाहीत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पवारांच्या आधी पत्रकार परिषद घेतली. राज्यात भाजपचे नव्हे तर शिवसेनेचे सरकार येईल, असे भाकीत त्यांनी वर्तवले. भाजपने शिवसेनेचे आमदार फोडले तर पोटनिवडणुकीत आम्ही त्यांना पाठिंबा देऊन निवडून आणू, असे पाटील म्हणाले. त्यामुळे राज्यात नवीन समीकरण अस्तित्वात येते काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

एक प्रतिक्रिया

  1. शरद पवार जे बोलतात त्याच्या उलटच घडत असत आता पर्यंतचा अनुभव आहे. म्हणजे शरद पवार किंगमेकर बनताहेत. भाजपपासून दूर जाण्यासाठी शिवसेनेला यासारखे वेळ कधीच मिळणार नाही. शिवसेनेने भाजपापासून तलाक घ्यावाआता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा