शरद पवार- सोनिया गांधी यांची आज दिल्लीत भेट, नव्या राजकीय समीकरणावर होणार चर्चा

0
99
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : राज्यात निर्माण झालेला सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी नव्या राजकीय समीकरणावर चर्चा होत असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची राजधानी दिल्लीत भेट होत आहे. त्यामुळे शिवसेना आणि अन्य भाजपविरोधी पक्षाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून दहा दिवस उलटून गेले तरी अद्याप कोणत्याही पक्षाने राज्यात सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर पवार- सोनिया गांधी यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्रातील सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्यावर शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार अशा नवीन राजकीय समीकरणाची राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आमच्याच पक्षाचा मुख्यमंत्री असेल, असे दावे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून सातत्याने करण्यात येत आहेत. मात्र अद्याप या दिशेने कोणतीही प्रगती झालेली नाही. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही आजच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेणार असून या भेटीत राज्यात परतीच्या पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राष्ट्रीय आपत्कालीन निधीवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येते.

शरद पवार- सोनिया गांधी यांच्या आजच्या भेटीतून काही ठोस नवीन राजकीय समीकरण पुढे आले तर राज्यात गेल्या दहा दिवसांपासून निर्माण झालेला सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. परंतु या दोन नेत्यांच्या भेटीत अशा समीकरणावर चर्चा झाली तरी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सरकार स्थापन करू द्या, त्यांना अपयश आले तर बदलत्या परिस्थितीत पाठिंब्याचा विचार करू, असेच या भेटीनंतर तूर्तास सांगितले जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा