मुंबई: राज्यातील सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला तिढा कायम असतानाच शिवसेनेला राज्यात सरकार स्थापनेसाठी पाठिंबा हवा असेल तर मोदी सरकारमधील केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सांवत यांनी राजीनामा द्यावा आणि भाजपशी असलेले सर्व संबंध तोडून टाकावेत, अशी अट राष्ट्रवादी काँग्रेसने घातली आहे. भाजपशी सर्व संबंध तोडून टाकण्यासाठी शिवसेना गंभीर आहे, हे दाखवून देण्याची पहिली पायरी म्हणून केंद्रातील अवजड उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला सांगितले आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला मदत करू शकते, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला आधी शिवसेनेने भाजपशी सर्व संबंध तोडलेले पहायचे आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘मुंबई मिरर’ला सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करून काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्यावर राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा शिवसेना करू लागली आहे. शिवसेनेला खरेच हे राजकीय समीकरण अस्तित्वात यावे असे वाटत असेल तर त्यांनी अरविंद सावंत यांना आधी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगावे. त्यातूनच शिवसेना भाजपशी सर्व संबंध तोडून टाकण्याबाबत गंभीर असल्याचे दिसून येईल. अन्यथा हे सर्व ‘बोलाचाच भात…’ ठरेल. शिवसेना केंद्रात भाजपच्या नेत्तृत्वातील सरकारमध्ये सत्ता उपभोगत असताना राज्यात आमच्याकडून पाठिंब्याची अपेक्षा कशी काय करू शकते?, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.
अरविंद सावंत यांनी मे महिन्यात मोदी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे. सावंत यांनी दक्षिण मुंबईतून काँग्रेसचे मिलिंद देवरा यांचा लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा पराभव केलेला आहे.
भाजप- शिवसेनेत सत्ता स्थापनेचा तिढा अवघड होऊन बसलेला असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दोन दिवसांत दोन वेळा भेट घेतल्यामुळे नव्या सरकारच्या स्थापनेत नव्या राजकीय समीकरणाची नांदी पहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे. राऊत हे पवार यांच्या पेडर रोडवरील सिल्व्हर ओक या निवासस्थानी मंगळवारी रात्री आणि पुन्हा बुधवारी रात्री भेट घेतली होती. त्यातच शिवसेनेकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही किंवा आपली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चाही झालेली नाही, असे शरद पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले असले तरी शिवसेना ज्या आत्मविश्वासाने भाजपशिवाय राज्यात सरकार स्थापन करण्याबाबत दावे करू लागली आहे, त्यावरून उभय पक्षांत काही तरी गुप्त खलबते झाल्याच्या चर्चेला बळकटी मिळू लागली आहे.