राष्ट्रवादी करणार ‘मेरिटभरती’, ‘मेगागळती’च्या भितीनेच भाजपचे पुन्हा आमचेच सरकार‘चे दावे!

0
392
संग्रहित छायाचित्र.

पुणे/मुंबई: विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्यांना पुन्हा पक्षात सामावून घेण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. भाजपचे 15 ते 20 आमदार आमच्या संपर्कात आहेत. परंतु आम्ही ‘मेगाभरती’ नव्हे तर ‘मेरिटभरती’ करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर शिवसेना वेगळी झाल्यामुळे पुन्हा सरकार स्थापनेचे भाजपचे स्वप्न भंगले. त्यामुळे आपले आमदार फुटून सरकार स्थापन करायला निघालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेनेत जाऊ शकतात, या भितीपोटीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुन्हा भाजपचेच सरकार येईल, असे दावे करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

शिवसेनेशी आघाडी करून सरकार स्थापनेच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पुण्यात झाली. भाजपमध्ये गेलेले 15 ते 20 आमदार आणि काही अपक्ष आमदारही आमच्या संपर्कात आहेत. मात्र आताच त्यांची नावे सांगणार नाही. त्यांच्यासाठी ते अडचणीचे ठरेल. आम्ही मेगाभरती करणार नाही. तर स्थानिक लोक, पक्षातील निष्ठावंत आणि तरूण मंडळींना विचारात घेऊनच ‘मेरिटभरती’ करणार आहोत, असे पाटील यांनी बैठकीपूर्वी पत्रकारांना सांगितले.थोडासा उशीर झाला तरी चालेल, पण राज्यात पाच वर्षे चालणारे स्थिर सरकार देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. भाजप आणि आमची विचारधारा वेगळी असल्याने आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

भाजपला मेगागळतीचीच धास्ती : दरम्यान, राज्यपालांनी निमंत्रित केल्यावर सरकार स्थापनेसाठी असमर्थता दर्शवणारी भाजप राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यात भाजपचेच सरकार येईल, आम्हाला सोबत घेतल्याशिवाय कोणालाही सरकार स्थापन करता येणार नाही, असे दावे करू लागल्यामुळे राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपचे संख्याबळ 105 आहे आणि 14 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा त्यांचा दावा आहे. तरीही 119 संख्याबळावर सरकार स्थापन करणे भाजपला शक्य दिसत नसतानाही असे दावे करण्यामागे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले आणि भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार पुन्हा स्वगृही परत जावू नये आणि पुढच्या बाजूला सत्ता दिसू लागल्यामुळे त्यांच्या सोबत आपल्याही आमदारांची ‘मेगागळती’ होऊ नये, एवढ्याचसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ‘ पुन्हा भाजपचेच सरकार’ असे दावे करून आमदारांना एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय राज्यात सरकार स्थापने शक्य नाही, हे भाजप नेतृत्वाला चांगलेच ठाऊक आहे आणि शिवसेनेच्या परतीचे दोर आता पुरते कापले गेलेले आहेत. दुसरीकडे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होण्याची चिन्हे दिसत असल्यामुळे त्यांचे आमदार फुटण्याची शक्यताही धूसर आहे. अशा स्थितीत पुन्हा आमचेच सरकारचे दावे करण्यामागे आपल्या आमदारांना धीर देण्याच्या प्रयत्नांचाच भाग असल्याचे मानले  जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा