कर्नाटकचे ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ महाराष्ट्रातः शिवसेना आमदार हॉटेल रंगशारदात, काँग्रेस-राष्ट्रवादीत फोडाफोडीसाठी आमदारांना भाजपची फोनाफोनी!

0
185
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः विधानसभेची मुदत संपायला अवघे काही तासच राहिलेले असताना 105 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने गुरूवारी राज्यपालांकडे जाऊन चहापान घेतले, मात्र सरकार स्थापनेचा दावा केला नाही. त्यामुळे राजधानी मुंबईतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आपलेच आमदार फोडून भाजप बहुमताएवढे संख्याबळ जुळवून सरकार स्थापनेचा प्रयत्न करण्याचा धोका सर्वच पक्षाना सतावू लागला आहे. त्यामुळे शिवसेनेने आपले सर्व आमदार मुंबईत बोलावून घेतले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बैठकीनंतर रंगशारदा हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवले आहेत. दुसरीकडे काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आमदारांची फोडाफोडी करण्यासाठी भाजपने फोनाफोनी सुरू केल्याचा खळबळजनक दावा दोन्ही काँग्रेसनी केला आहे. काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना शुक्रवारी तातडीने मुंबईत पोहोचण्याचे फर्मान सोडले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे चार दिवसांचा शेतकरी संवाद दौरा अर्धवट सोडून मुंबईला रवाना झाले आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार आणि गिरीश महाजन यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची गुरूवारी राजभवनात जाऊन भेट घेतली. त्यांच्या समवेत भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस नसल्यामुळे या भेटीत ते सरकार स्थापनेचा दावा करणार नाहीत, हे आधीच स्पष्ट होते. राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करत राजभवनात चहापान घेऊन भाजपचे शिष्टमंडळ परतले. आता संपूर्ण विचाराअंती भाजपश्रेष्ठीच सरकार स्थापनेबाबत अंतिम निर्णय घेतील, असे चंद्रकांत पाटील यांनी या या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.त्यामुळे येत्या एक-दोन दिवसात तरी भाजप स्वतःहोऊन राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

रिसॉर्ट पॉलिटिक्सचा दुसरा अंक महाराष्ट्रात

कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर तेथील आमदारांना मुंबईत हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. या रिसॉर्ट पॉलिटिक्सच्या जोरावरच भाजपने कर्नाटकातील सत्ता हस्तगत केली होती. त्याच रिसॉर्ट पॉलिटिक्सचा दुसरा अंक आता महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाला आहे. शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना पुढील आदेश येईपर्यंत मुंबई सोडायची नाही, असे बजावत रंगशारदा हॉटेलमध्ये मुक्कामाला ठेवले आहे. तत्पूर्वी या सर्व आमदारांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत बैठक झाली. या बैठकीत अंतिम निर्णयाचे सर्वाधिकार उद्धव ठाकरेंना बहाल करण्यात आले. शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसनेही आपल्या सर्व आमदारांना तातडीने मुंबईत पोहोचण्याचे फर्मान सोडले आहे. त्यांनाही रिसॉर्टमध्ये एकत्र ठेवले जाण्याची शक्यता आहे.

फोडाफोडीसाठी भाजपकडून फोनाफोनी!

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी भाजपकडून या आमदारांना फोनाफोनी करण्यात येत असून त्यांना विविध प्रलोभने दाखवली जात आहेत, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी केला आहे. येत्या काळात बळजबरी, धमकावण्याचे प्रकार सुरू होऊ शकतात. मात्र काहीही झाले तरी आमचा एकही आमदार फुटणार नाही, जे काही फुटायचे होते ते आधीच फुटून गेले आहेत, असा विश्‍वास या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला आहे.

शरद पवार तातडीने मुंबईत

दरम्यान, महाराष्ट्रातील भाजप- शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी कौल दिला आहे. आम्ही विरोधी पक्षातच बसू, असे सांगून चार दिवसांच्या शेतकरी संवाद दौर्‍यावर निघालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कराडमध्ये दौरा अर्धवट सोडून मुंबईत पोहोचले. शुक्रवारी मध्यरात्री विद्यमान विधानसभेची मुदत संपणार असल्यामुळे मुंबईत वेगाने घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर पवार मुंबईत परतले असावेत, असा अंदाज बांधण्यात येत आहे.

 बहुमत नसेल तर स्पष्ट सांगून टाका : शिवसेनेचे भाजपला आव्हान

भाजपकडे सरकार स्थापनेची क्षमता नसेल तर त्यांनी तसे स्पष्टपणे सांगून टाकावे, असे आव्हान शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले आहे. आमचे सरकार येणार नसेल तर कुणाचेही सरकार येऊ देणार नाही, अशी भूमिका जर कुणी घेत असेल तर ते चालणार नाही. राज्यघटना कुणाच्या बापाची जहागिरी नाही. आता कोणतीही दहशत, धमक्या, ब्लॅकमेलिंग, पोलिसी बळाचा वापर चालणार नाही. हा शिवसेनेचा इशारा आहे. साम दाम दंड भेद ही निती जोपर्यंत खुर्ची आहे तोपर्यंतच चालते. सत्तेचा माज आणि मस्ती उतरली की साम दाम दंड भेदाचे सगळे अलंकार गळून पडतात, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा