ईव्हीएम हॅक करण्यात आले नाही तर राज्यात वंचित बहुजन आघाडीच सत्तेवर येणार : प्रकाश आंबेडकर

0
937
संग्रहित छायाचित्र.

यवतमाळः नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आणि त्यापूर्वीच्याही निवडणुकीत मोठ्या प्रमाणात ईव्हीएम यंत्रे हॅक करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम यंत्रे हॅक झाली नाही तर राज्यात वंचित बहुजन आघाडीच सत्तेत येईल, असे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

 यवतमाळ येथे पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम यंत्रे वापरण्यात आली नसती तर वंचित बहुजन आघाडीने 12 जागा जिंकल्या असत्या. आता आपला व्यवसाय बुडण्याच्या भितीने ईव्हीएम हॅकरच विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक करणार नाहीत, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. लोकांना बदल हवा आहे. भाजप चुकीचे चित्र रंगवत आहे. देशातील बँका बुडण्याच्या स्थितीत आहेत. सरकारची तिजोरी रिकामी आहे. व्यापारी, कारखानदार आणि कामगार असे सर्वच घटक देशातील आणि राज्यातील भाजप सरकारमुळे त्रस्त आहेत.  कापसाला चार हजार रुपये क्विंटलपेक्षा जास्त भाव मिळत नाही, म्हणून शेतकरी त्रस्त आहे. या सर्व बाबी लक्षात घेता आम्हीच सरकारचे खरे विरोधक आहोत, हे या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होईल, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

सत्तेत आल्यास ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती 

राज्यात वंचित बहुजन आघाडी सत्तेवर आल्यास लघु आणि मध्यम उद्योगांना उभारी देऊन कृषी उद्योगाचे जाळे निर्माण करू. त्यामुळे राज्यात रोजगार वाढेल. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती लागू करू. दुष्काळी भागात शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करू, असे सांगतानाच विधानसभेत भाजप-शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीतच खरी लढत आहे. राज्यात वंचित बहुजन आघाडीने 272 उमेदवार दिले आहेत. आम्ही टीकेचे राजकारण सोडून ‘मेन स्ट्रीम डेव्हलपमेंट’बाबत जनतेला समजावून सांगत आहोत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा