भाजपशिवाय शिवसेना सरकार स्थापन करणार, बहुमताची तयारी झाल्याचा संजय राऊत यांचा दावा

0
761
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : सर्वाधिक 105 जागा मिळवलेला सर्वात मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापन करण्याचा पहिला अधिकार भाजपचाच आहे. परंतु भाजपला जर सरकार स्थापन करता आले नाही तर शिवसेना सरकार स्थापन करेल, आमच्याकडे पाठिंब्याची पत्रे आहेत. शिवसेना सत्तेपासून फक्त एक पाऊलच दूर आहे, असा दावा करून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. शिवसेनेने भाजपशी संबंध तोडून टाकले तरच पाठिंब्याचा विचार होऊ शकतो, असे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शुक्रवारी केलेले वक्तव्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोनिया गांधी यांच्या भेटीला दिल्लीत जाणार असल्याच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचे हे वक्तव्य आल्यामुळे शिवसेना- भाजप युतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता मावळल्याचे मानण्यात येऊ लागले आहे.

भाजप- शिवसेनेतील सत्तावाटपाचा तिढा गेल्या आठवडाभरापासून रंगलेला आहे आणि त्यातून मार्ग निघण्याची शक्यता धूसर होत चालली असतानाच संजय राऊत यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेची सरकार स्थापन करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. बहुमतासाठी लागणारा 145 चा जादुई आका आमच्याकडे आहे. भाजपला सरकार स्थापन करण्यात अपयश आले तर शिवसेना सरकार स्थापन करेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

राज्यात सरकार स्थापन करण्याची क्षमता शिवसेनेकडे आहे. आम्ही तयार आहोत. सरकार स्थापन करण्यासाठी आम्हाला मदत करू इच्छिणाऱ्या लोकांच्या पाठिंब्याची पत्रे आमच्याकडे आहेत. भाजप सरकार स्थापन करू शकली नाही तर आम्ही राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा करू असेही राऊत यांनी म्हटले आहे. मी केवळ बोलायचे म्हणून बोलत नाही तर शिवसेना सरकार स्थापनेच्या फक्त एक पाऊलच दूर आहे. आमच्याकडे बहुमत आहे. मी हवेत बोलत नाही. ही कागदपत्रे पाहा, सर्व काही तयार आहे. आमच्याकडे बहुमताचा आकडा आहे, एवढेच मी सांगू इच्छितो, असा दावाही त्यांनी केला आहे.

पहिली संधी भाजपलाच मिळावी

सर्वात मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापन करण्याची पहिली संधी भाजपलाच मिळालयला हवी. त्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीचे अनेक नेते सोबत घेतले तरी त्यांना 105 जागाच जिंकता आल्या आहेत. 145 हा बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी त्यांच्याकडे ईडी आणि राज्यपाल भवन आहे. ते राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या धमक्या देत आहेत. सरकार स्थापनेसाठी आधीच प्रचंड विलंब झाला आहे. भाजपकडे नवनिर्वाचित आमदारांची यादी आहे. ती त्यांनी राज्यपालांकडे दाखल करावी. परंतु भाजप तरीही पुढे जायला तयार नाही, त्यामुळे आम्हाला शंका येऊ लागली आहे. याचाच अर्थ भाजपला सरकार स्थापन करण्यात अपयश आले आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे. आता राज्यपालांनीच महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी स्वतःहोऊन पुढाकार घ्यायला हवा, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.

शपथविधी वानखेडेवर घ्या की चांद्रयान-2 वर!

सरकार स्थापनेबाबतची अनिश्चितता संपली नसतानाच 5 नोव्हेंबर रोजी शपथविधीसाठी भाजपने मुंबईतील वानखेडे स्टेडियम बुक केला आहे. त्याबाबत विचारले असता राऊत म्हणाले, हे पहा, त्यांच्याकडे जर बहुमत आहे तर त्यांनी वानखेडेवर शपथविधी घ्यावा किंवा त्यांनी जे चांद्रयान-2 पाठवले आहे, तेथे घ्यावा. त्यांना शपथविधी घेण्यापासून कुणी रोखले आहे? परंतु निकाल लागून नऊ दिवस उलटले आहेत तरीही राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. सरकार स्थापन झाले पाहिजे, असे आम्हालाही वाटते. महाराष्ट्राला स्थैर्य हवे आहे, असे राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा