मुंबई: राज्यातील जनतेने भाजप- शिवसेनेला कौल दिला आहे. त्यामुळे राज्यात त्यांनीच सरकार स्थापन करावे आणि आम्हाला जबाबदार विरोध पक्ष म्हणून काम करण्याची संधी द्यावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले. शिवसेना 25 वर्षे युतीत सडली, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर 25 वर्षे सडले तरी एकत्र लढले, असा टोला पवारांनी शिवसेनेला लगावला.
शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आज शरद पवार यांच्या पेडररोडवरील सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर शरद पवारांनी ही पत्रकार परिषद घेतल्यामुळे काही तरी महत्वाची घोषणा होणार, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. मात्र पवारांनी ती शक्यता फोल ठरवली.
शिवसेना- भाजप 25 वर्षांपासून एकत्र आहेत. राज्यातील जनतेने सत्ता स्थापनेसाठी त्यांनाच कौल दिला आहे. आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी निर्माण झालेला पेच मिटवून लवकरात लवकर सरकार स्थापन करावे आणि आम्हाला जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी द्यावी. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला शंभरच्या वर आकडा गाठता आलेला नाही, त्यामुळे आमचे सरकार कसे बनेल?, असे पवार म्हणाले. संजय राऊत यांच्याशी भेटीत नेमकी काय चर्चा झाली, असे विचारले असता पवार म्हणाले, आमच्या भेटीत राज्यसभा अधिवेशनावर चर्चा झाली. त्यांची माझी भेट कायमच ‘सकारात्मक’ होते, तशी ती आजही झाल्याचे पवारांनी सांगितले.
[…] […]