काँग्रेस- राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे सरकार आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री!

0
231
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच अखेर सुटला असून काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचेच सरकार असे नवीन समीकरण राज्यात आकाराला आले आहे.  दिवसभर चाललेल्या खलबतानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्लीत बोलावून विचारविमर्श केला. सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यातही फोनवर सुमारे सात मिनिटे चर्चा झाली. या चर्चेनंतर शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र राज्यपाल आणि शिवसेनेलाही काँग्रेसने फॅक्सद्वारे पाठवले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याचे पत्र तर आधीच तयार होते. काँग्रेस काय भूमिका घेते, त्यानंतर आम्ही आमची भूमिका घेऊ असे राष्ट्रवादी काँग्रेसने सांगितले होते. दिवसभर चाललेल्या खलबतानंतर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते एकनाथ शिंदे हे शिवसेना नेत्यांसह सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनात गेले आहेत. तेथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन ते सरकार स्थापनेचा दावा करतील आणि पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना या नव्या शिवमहाआघाडीच्या फॉरर्म्युल्याची माहिती देतील.

हेही वाचा: Exclusive: पाठिंब्यास काँग्रेस- राष्ट्रवादी अनुकूल, 5.30 वाजेपर्यंत ‘शिवसेनेचे सरकार’ची घोषणा?

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा