चर्चा ‘वंचित’च्या राजकारणावर: वर्चस्ववादी ब्राह्मणी शक्तीविरुद्ध लढा उभा राहूच दिला जाणार नाही!

1
674
संग्रहित छायाचित्र.

‘वंचित बहुजन आघाडीचे राजकारण : चक्रव्यूह भेदला, आता हवे आत्मभानाचे दीप प्रज्वलन!!’ हा आर. एस. खनके यांचा लेख newstown.in वर प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणावर व्यापक चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या निमित्ताने वंचितांच्या राजकारणाच्या विविध आयामांवर चर्चा व्हावी, असे आम्हाला वाटते. या चर्चेत आपणही सहभागी होऊ शकता. या लेखावर शांताराम पंदेरे यांनी आपली भूमिका मांडली आहे ती अशी….

 • शांताराम पंदेरे (लेखक बहुजन चळवळीचे अभ्यासक आणि भाष्यकार आहेत.)

हेही वाचा : वंचित बहुजन आघाडीचे राजकारण : चक्रव्यूह भेदला, आता हवे आत्मभानाचे दीप प्रज्वलन!!

‘वंचित बहुजन आघाडीचे राजकारण: चक्रव्यूह भेदला, आता हवे आत्मभानाचे दीपप्रज्वलन ’ या लेखात आर. एस. खनकेजींनी अत्यंत रोखठोकपणे योग्य मांडणी केली आहे. यात आणखी काही मुद्दे घालत आहे.

 • निवडणुकीत ब्राह्मणी-क्षत्रिय शक्ती व संघ-भाजप-काँग्रेस पक्षांशी युती करणे वेगळे आणि निवडणुकीत स्वतंत्रपणे जिंकलेल्या शक्तीवर नंतर काँग्रेस आणि डावे-पुरोगाम्यांबरोबर “आघाडी” करणे यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे.
 • आणि हीच गल्लत आजवर आपल्या ‘तुलनेने राजकीयदृष्ट्या खूपच जागृत’ फुले –आंबेडकरी चळवळीची होत आली आहे. ती मुद्दामहून केली जात आहे. यात “ब्राह्मणी-काँग्रेसी सुरक्षित, प्रस्थापित मानसिकतेत सारे पुरोगामी आघाडीवर आहेत!
 • “काँग्रेसी धर्मनिरपेक्षता धोक्यात आली आहे आणि संघ-भाजपची भीती दाखवली की आपल्यातील काँग्रेसींना दलित ऐक्य वा काँग्रेसशी आघाडी करा असा कट यशस्वीपणे अंमलात आणणे सोपे गेले आहे. आताही त्याच दिशा व वेगाने वाटचाल चालू आहे. अडकवण्यासाठी जाळे टाकणे सुरु झाले आहे. सावधान!
 • क्षत्रियत्वाचा निरंतर उदो उदो करणारी आणि नेहमीच “शूद्रातिशूद्रांचा (एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी इत्यादी सामाजिक घटकांचा) द्वेष करत हिंसा लादणारी काँग्रेस, त्यांचे काँग्रेसी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली निरंतर समर्थन करणारे आमचे मित्र सारे पुरोगामी व संघ-भाजप परिवार वर्चस्ववादी ब्राह्मणी शक्तींविरुद्धचा लढा कधीच उभा राहू देणार नाहीत ही सूर्य प्रकाशाएवढी सत्य गोष्ट आहे. यात दोघांचेही सामाजिक-सांस्कृतिक, राजकीय व आर्थिक सत्तेचे हितसंबंध गुंतलेले आहेत.
 • यातूनच हिंगोलीपासून अकोला- औरंगाबादपर्यंत एकच ” राजकीय खेळी” काँग्रेसने खेळली. जिथे मुर्तजापूर, हिंगोली-कळमनुरी, औरंगाबादसारख्या ठिकाणी जर वंचित येत असेल आणि “काँग्रेस येत नसेल तर सरळ भाजप-शिवसेनेकडे मतं जाऊ देत. पण कोणत्याही परिस्थितीत आंबेडकर नकोत.” हा मोठा खेळ काँग्रेस करत आली आहे.
 • दलित ऐक्याने चार खासदार निवडून यायला मदत केली. साऱ्यांना आकाशाला हात टेकल्याचा साक्षत्कार झाला. काँग्रेसी अतिप्रेम अजूनपर्यंत टिकवले गेले आहे. कारण उरलेल्या महाराष्ट्रात त्यांना फुकटात काँग्रेसी खासदार यायला सरळ मदत झाली! हे मात्र कुणीही सांगत नाही.
 • त्याचबरोबर हे कुणीच पाहत नाही की सांगत नाहीत की, जिथे जिथे बाळासाहेब यांची ओबीसी, बौद्ध माणसे उभी होती,  तिथे आपली लाखो मतं मिळवूनही जिंकू दिली नाहीत. ती मतं सरळ “धर्मनिरपेक्षी काँग्रेस” ने “अतिप्रिय भाजप-शिवसेने” कडे वळवली! या संदर्भाने आता झालेल्या व पूर्वीच्या सर्व निवडणुकांच्या निकालांकडे पाहिले पाहिजे.

एक प्रतिक्रिया

 1. मला वंचित बहुजन आघाडी च्या उद्देश आणि ध्येय या बद्दल शंका येत आहे जर खरच एक पक्ष संघटन जे वंचित बहुजनाना एकत्र येऊन एक स्वतंत्र पर्याय उपलब्ध करायचा होता ,तर त्यांनी टप्प्याटप्प्याने ज्याठीकाणी उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे त्या ठीकाणी लक्ष केंद्रित करून त्यावर भर देणे गरजेचे होते. पण सरसकट सर्व महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले त्यामुळे काय साध्य झाले? हा संशोधनाचा विषय आहे. यामुळे उलट वंबआ हा पक्ष भाजपची बी टीम असल्याचे बोलले जात आहे आणि अत्ताच झालेल्या निवडणुकीतून आकडेवारीतून त्याला दुजोरा प्राप्त होतो.आघाडीचे एकूण ३२ उमेदवार मत विभाजनामुळे पडले हे यातून दिसून येतं. दुसरी गोष्ट वंबआ या पक्षाकडे अचानक एवढा निधी उपलब्ध कसा झाला हा ही विचारात टाकणारा मुद्दा आहे. कारण बाळासाहेबांनी दोन्ही निवडणूकीत येवढ्या प्रचार सभा आणि प्रचार यंत्रणा उभी केली त्यासाठी येवढा निधी कोणत्या मार्गाने आला हे अस्पष्ट आहे.
  अत्ता पर्यंत च्या एकूणच वाटचालीतून वंबआ मुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या भाजप ला फायदा झाल्याचे दिसते. त्यामुळे भाजपची बी टीम असल्याची जी टीका केली जाते ती खरी असावी अशी माझ्या सारख्या सामान्य मतदारांना शंका येते.
  यापुढे तरी वंबआ ची नेत्यांनी खरच जर त्यांना वंचित बहुजन मतदारांना विश्वासात घ्यायचे असेल तर पक्ष संघटन आणि पक्ष बांधणी करून आपली नेमकी विचारसरणी काय आहे स्पष्ट करावे. तसेच प्रत्येक गावागावात, तालुक्यात, जिल्यात पक्ष संघटन आणि पक्षाची तात्विक बाजू सक्षम पणे मांडावी जेणेकरून पक्ष विस्तारेल आणि पक्षाचा खरा हेतू साध्य होईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा