वंचित बहुजन आघाडीची सहा महिन्यांतच 50 टक्के मते घटली, घटलेली मते काँग्रेस- राष्ट्रवादीकडे !

1
870
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः लोकसभा निवडणुकीत लक्षणीय कामगिरी बजावत एकूण मतदानापैकी 14 टक्के म्हणजेच 41 हजारांहून अधिक मते मिळवणार्‍या वंचित बहुजन आघाडीची मते अवघ्या सहा महिन्यांच्या आतच 50 टक्क्यांनी घसरून 24 लाखांच्या आसपास आली आहेत. वंचित बहुजन आघाडीला मिळणारी मते घटली असली तरी या आघाडीमुळे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसला तब्बल 32 विधानसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागल्याचे  उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होऊ लागले आहे. ही घटलेली मते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसकडे वळल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.

एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी 47 मतदारसंघांत 41 लाखांहून अधिक मते मिळवली होती. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला एकही जागा जिंकता आली नव्हती. मात्र अनेक मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी एक लाखांपेक्षाही जास्त मते मिळवून किमान 12 लोकसभा मतदारसंघात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे विजयाचे गणित बिघडवले होते. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या टक्केवारीच्या आधारे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला किमान 20 जागा तरी मिळतील असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र एकही जागा वंचितच्या पदरात पडली तर नाहीच उटल लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या संख्येत निम्मी घट झाली आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केले आहे. वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत चांगल्या पद्धतीने लढत दिली. निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने 24 लाखांपेक्षा जास्त मिते मिळवली. आपण जिंकू शकलो नाही तरी, 10 जागांवर दुसर्‍या क्रमांकाची मते घेतली आहेत. अनेक ठिकाणी आपण जोरदार टक्कर दिली व तिसर्‍या क्रमांकावर आहोत. आपण सर्व संघर्षातून उभे राहिलो आहोत. यापुढेही वंचित, शोषितांच्या राजकारणासाठी त्याच ताकदीने लढू. आगामी काळात वंबआघाडी राज्याच्या राजकारणात तच ताकदीने उभी राहील. जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांवर, सामाजिक, राजकीय न्या, हक्कांसाठी आपण लढतच राहू!, असे प्रकाश आंबेडकरांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचा फटका बसला आहे. 32 विधानसभा मतदारसंघात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार 5 ते 10 हजार मतांच्या फरकांनी पराभूत झाले आहेत. त्याच मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी 10 हजारांपेक्षा जास्त मते घेतली आहेत. चाळीसगाव, बुलडाणा, चिखली, सिंदखेड राजा, खामगाव, अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व, मूर्तीजापूर, वाशिम,धामनगाव रेल्वे, नागपूर दक्षिण, बल्लाळपूर, चिमूर, राळेगाव, यवतमाळ, अर्णी, किनवट, नांदेड उत्तर, जिंतूर, पैठण, उल्हासनगर हे ते मतदारसंघ आहेत.

वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीशी युती करून निवडणूक लढवली असती तर वंचितला किमान 20 जागांवर विजय मिळाला असता आणि काँग्रेस आघाडीच्याही 32 जागा वाढल्या असत्या. त्यामुळे राज्याचे आज दिसणारे चित्र वेगळे असते आणि वंचित बहुजन आघाडी सत्तेतील वाटेकरी राहिली असती, असेही आता बोलले जाऊ लागले आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा