लक्ष्मीपूजनालाच सत्तासंघर्षाचे फटाके :भाजप म्हणते पाच वर्षे मुख्यमंत्री आमचाच; सत्तेचा कॅनव्हॉस आम्हीच रंगवू :शिवसेना

1
215
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून तीन दिवस उलटले तरी सत्तेचा राजशकट कोणाच्या हातात असेल, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र सर्वाधिक जागा मिळालेला भाजप आणि त्याचा मित्रपक्ष यांच्यातच मुख्यमंत्री कोणाचा आणि सरकार कोणाच्या नेतृत्वाखाली असेल, यावरून रविवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच राजकीय सत्तासंघर्षाचे सुतळीबॉम्ब फोडून आतषबाजी करण्यात आली. आणखी दोन- तीन दिवस राजकीय फटाक्यांची ही आतषबाजी अशीच सुरू रहाणार असून महाराष्ट्रीय जनतेला दिवाळीच्या गोडधोड फराळासोबतच राजकीय खेचाखेचीच्या टोलेबाजीचे चटपटीत ‘नमकीन’ तोंडी लावायला मिळणार आहे.

पुढील पाच वर्षे सरकार भाजपच्या नेतृत्वाखालीच: फडणवीस

 अडीच- अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समान वाटा मिळावा, यासाठी शिवसेनेने दबाव वाढवला असतानाच भाजपला जनतेने सर्वात मोठा पक्ष म्हणून कौल दिला आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षे भाजपच्या नेतृत्वाखालीच युतीचे सरकार काम करणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे मुख्यमंत्रिपद भाजपकडेच राहील आणि मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ अडीच- अडीच वर्षे वाटून घेण्याची शिवसेनेची मागणी भाजपला मान्य नाही, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. मुंबईत भाजपच्या दिवाळी संमेलनात बोलताना त्यांनी हे विधान केले. दिवाळीनंतर भाजपच्या विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होईल आणि त्यानंतर नव्या सरकारचा शपथविधी होईल, असेही फडणवीस म्हणाले.

सत्तेच्या कॅनव्हॉसवर शिवसेनाच रंग भरणार

 दुसरीकडे, राज्याच्या सत्तेचा कॅन्व्हॉस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच हातात असून त्या कॅन्व्हॉसमध्ये शिवसेनाच रंग भरेल, असे सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. शिवसेनेपुढे अन्य कोणते पर्याय आहेत, या प्रश्नाच्या उत्तरात राऊत यांनी आम्हाला कोणतीही अडचण नाही. आमच्यासमोरचे पर्याय लवकरच समजतील, असे राऊत म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी आणि शिक्षण क्षेत्रात कौतुकास्पद काम केले आहे. प्रत्येक नवनिर्वाचित आमदाराने बारामतीला भेट देऊन ते काम पहायला हवे, अशी स्तुस्तीसुमने उधळून राऊत यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची जवळीक वाढत चालल्याचेही स्पष्ट संकते दिले आहेत.

उन्मादाने वागणाऱ्याचा ‘उदयनराजे’ होतो

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्या ‘रोखठोक’मधून भाजपवर तोफ डागली आहे. शिवसेनेला अडवायचे व विरोधकांना कस्पटासमान लेखून पुढे जायचे ही भाजपची भूमिका होती. लोकांनी ती ठोकरून लावली. महाराष्ट्र लढणाऱ्यांच्या व संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहतो, हे यापूर्वी दिसले आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले असे विचारणाऱ्यांना साताऱ्यासह राज्यातील 100 मतदारसंघात त्याचे उत्तर मिळाले. महाराष्ट्राला गृहित धरू नका. उन्मादाने वागणाऱ्याचा ‘उदयनराजे’ होतो, असे राऊत यांनी म्हटले आहे.

एक प्रतिक्रिया

  1. शिवसेनेने आपल्या भुमिकेशी प्रामाणिक राहीले तर भाजप ला महाराष्ट्रात सत्ता स्थापन करता येणार नाही. ५० टक्के हिस्सा सत्तेत न देण्याची भूमिका भाजपा ची असेल तर शिवसेना काॅंग्रेस राष्टवादीशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन करील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा