शरद पवारांच्या चक्रव्यूहात अडकल्याने बहुमत मिळूनही भाजप- शिवसेना महायुती सत्तेला मुकली!

0
436
संग्रहित छायाचित्र.

 मुंबई : महायुती करून विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलेल्या भाजप- शिवसेनेला निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळूनही सत्तेपासून दूर ठेवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची खेळी यशस्वी झाली. शरद पवारांनी आखलेल्या चक्रव्यूहात राजकीय अनुभव कमी पडल्याने शिवसेना अलगद अडकली  आणि त्यातच त्यांचा गेम झाला.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शरद पवारांविरुद्ध गुन्हा नोंदवल्यापासूनच पवार पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आणि भाजपचे पूर्ण बहुमताचे स्वप्न भंगवले. त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेने महायुतीलाच जनादेश दिला आहे. त्यांनी सरकार स्थापन करावे, असे सांगत आम्ही विरोधी पक्षातच बसू. त्यांनी लवकर सरकार स्थापन करून जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्हाला संधी द्यावी, असे शरद पवार सांगत राहिले आणि दुसरीकडे सत्तेत समान वाटा आणि अडीच- अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर अडून बसलेल्या शिवसेनेलाही चुचकारत राहिले. राज्यपालांनी आपणास सरकार स्थापन करण्यास निमंत्रित केले तर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस धावत-पळत पाठिंब्याची पत्रे देतील, या भ्रमात शिवसेना राहिली आणि त्याच भरवश्यावर शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असे दावे करत राहिली. सरकारच स्थापन करायचे होते तर शिवसेनेने काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या हायकमांडशी बोलणीच्या फेर्‍या आधीपासूनच सुरू करायला हव्या होत्या. तसे न करता राज्यपालांचे निमंत्रण आल्यावर सोमवारी दुपारच्या सुमारास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला गेले. काँग्रेसशी बोलणी करण्याची जबाबदारी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधूनच बाहेर पडलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर सोपवली. सत्तेच्या राजकारणाचा अनुभव कमी पडल्यामुळे शिवसेना अशा चुका करत गेली.  या एकूणच प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत हे शरद पवारांना अनेकदा भेटले. मात्र त्यांनी अधिकृतपणे कधीही पवारांकडे पाठिंब्यासाठीचा प्रस्तावच नेला नाही. राज्यपालांनी निमंत्रण दिल्यावर ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना भेटण्यासाठी दिल्लीत गेले.त्यामुळे राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याची पत्रे मिळवण्यात शिवसेनेला अपयश आले. त्यामुळेच शिवसेनेचा गेम झाला.

या सर्व घडामोडींत भाजप, शिवसेना हे किती उथळ राजकीय पक्ष आहेत,हा संदेश देशभर देण्यात शरद पवार यशस्वी तर झालेच. शिवाय एक आदर्श विरोधी पक्ष कसा असावा, याचा परिपाठ घालून देण्यातही शरद पवारांना यश आले. या सगळ्याच प्रकरणात जे काही गमावले ते बहुमत असूनही भाजप- शिवसेनेच गमावले.काँग्रेस- राष्ट्रवादीकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते.झालीच तर शिवसेनेच्या पाठिंब्यावर आपसूक सत्ता मिळण्याची कमाई होऊ शकते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा