145 चा आकडा असेल तर ‘त्यांनी’ खुशाल सरकार स्थापन करावे : शिवसेनेचा भाजपला पुन्हा इशारा

0
214
संग्रहित छायाचित्र.

मुंबई :  विनाश काले विपरित बुद्धी ही शिवसेनेची नव्हे तर भाजपची अवस्था झाली आहे. 145 चा आकडा असेल तर भाजपने खुशाल सरकार स्थापन करावे. त्यांनीच काय ज्यांच्याकडे हा आकडा असेल त्या कुणीही सरकार स्थापन करावे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेना आमच्या सोबत येणार नसेल तर आम्हाला पर्याय खुले आहेत, असे भाजप म्हणू शकते तर आम्हालाही तसे म्हणण्याचा हक्क आहे, असेही राऊत म्हणाले.

अडीच- अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि सत्तेचे समान वाटप या शिवसेनेच्या मागणीवरून महायुतीत सत्तावाटपाचा पेच निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत शिवसेनेचा विधिमंडळ नेता निवडला जाणार आहे. त्या आधी शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आपल्या मागणीवर ठाम असल्याचा पुनरूच्चार केला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमित शाह यांच्या उपस्थितीत जी पत्रकार परिषद झाली होती. त्यात सत्तेचे समान वाटप होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. सत्तेचे समान वाटप ठरले होते मग त्यात मुख्यमंत्रिपद येत नाही का?, मुख्यमंत्रिपद काय एनजीओचे पद आहे का?, असा सवालही राऊत यांनी केला आहे. आम्ही कोणतीही नरमाईची भूमिका घेतलेली नाही. युती असल्याने चर्चा होऊ शकते, एवढेच शिवसेनेने म्हटले आहे. यात नरमाईचे काहीही धोरण नाही, असे सांगत राऊत यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि सत्तेचे समसमान वाटप या मागणीवर शिवसेना ठाम असल्याचेच संकेत दिले आहेत. त्यामुळे भाजप- शिवसेनेत निर्माण झालेला सत्तावाटपाचा तिढा लवकर सुटण्याची शक्यता धुसर होत चालली आहे.

मुख्यमंत्रिपद शिवसेनेलाच दिले : मुनगंटीवार

दरम्यान, सत्तावाटपाचा वाद चिघळत असतानाच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिकच आहेत, त्यामुळे आम्ही मुख्यमंत्रिपद शिवसेनेलाच दिले आहे, असे विधान त्यांनी केले आहे.येत्या आठवड्यात देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. भाजप- शिवसेनेचा शपथविधी एकत्रच होईल. नाही नाही म्हणत शिवसेना आमच्या सोबतच येईल, असेही मुनगंटीवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा