यंदा चांगलं पाऊसपाणी होऊ दे… बळीराजाच्या घरी सुखसमृद्धी नांदू देः अजितदादांचे पांडुरंगाला साकडे

0
62
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: पांडुरंगा, राज्यात यंदा चांगलं पाऊसपाणी होऊ दे… बळीराजाच्या शेतात, घरात समृद्धी नांदू दे… कोरोनाचे संकट दूर करुन सर्वांना चांगले आरोग्य दे… जनतेला सुखी ठेव… कोरोनाविरुद्ध लढत असलेले डॉक्टर, नर्सेस, आरोग्य-सफाई कर्मचारी, अंगणवाडी ताई, आशाताई, पोलिस या सगळ्या कोरोनायोद्ध्यांना बळ दे.. त्यांचे संरक्षण कर… देवा विठ्ठला महाराष्ट्राचे भले कर, राज्यावरचे प्रत्येक संकट दूर करण्याची शक्ती आम्हाला दे… असे साकडे पंढरपुरच्या पांडुरंगाचरणी घालत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पांडुरंगभक्तांना, वारकऱ्यांना, राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी एकदशीनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत, लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी वंदन केले असून महाराष्ट्राला, देशाला, जगाला कोरोनामुक्त कर, अशी आळवणी विठ्ठलाकडे केली आहे.

पंढरपुरच्या वारीची शेकडो वर्षांची परंपरा यावर्षीही प्रतिकात्मक पद्धतीने कायम राखली गेली. संतांच्या पादुका परंपरेनुसार पंढरपूरला पोहोचल्या. याचा आनंद व्यक्त करत असतानाच कोरोनाचे संकट लक्षात घेऊन आपापल्या घरी थांबून  आषाढी एकदशीला घरूनच पंढरपूरच्या विठ्ठलाचे स्मरण, पूजा, भक्ती करत असलेल्या लाखो वारकऱ्यांनाही उपमुख्यमंत्र्यांनी वंदन केले आहे.

पुढच्या एकादशीला कोरोनाचे संकट जगातून हद्दपार झालेले असेल आणि पुन्हा आपण नाचत-गाजत पंढरपूरची वारी करु, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाचं संकट लक्षात घेऊन पांडुरंगभक्तांनी, राज्यातील जनतेने अधिक काळजी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा