अजित पवारांचा राष्ट्रवादीतील ‘मान आणि स्थान’ कायम: म्हणाले, शरद पवार हेच अंतिम नेतृत्व!

0
551
छायाचित्र: अजित पवार यांच्या ट्विटर हॅन्डलरवरून साभार.

मुंबईः महाराष्ट्राच्या महानाट्यात अचानक भाजपशी हातमिळवणी करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतलेल्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या साडेतीन दिवसांच्या सरकारमधील उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन घरवापसी केलेल्या अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील मान आणि स्थान कायम असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीत अजित पवारांनी मार्गदर्शन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक बोलावली होती. या बैठकीतील अजित पवारांची उपस्थिती महत्वाची ठरली. आपण सगळेच पुन्हा नव्या जोमाने कामाला लागू. मी नाराज नव्हतो. मी पक्षातच आहे आणि यापुढेही पक्षातच राहणार आहे. पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे. आपण एक आहोत आणि शरद पवारांचे नेतृत्व अंतिम आहे.त्यांच्याच नेतृत्वाखाली आपणाला महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस वाढवायची आहे. सरकारच्या माध्यमातून सामान्य माणसांची सेवा करायची आहे, असे अजित पवार आमदारांना संबोधित करताना म्हणाले.

 अजितदादा किती मोठे काम करून आलेत!

 अजित पवारांच्या बंडाने सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र विकास आघाडीतील नेते मात्र अगदीच सामान्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रीय झालेल्या अजित पवारांना उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळणार काय?, असे शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारले असता अजित पवार महाराष्ट्र विकास आघाडीत मोठी भूमिका बजावतील. अजित पवार किती मोठे काम करून आले आहेत, हे तुम्ही पाहिलेच असेल. अजित पवार पुन्हा परततील असे आम्ही पहिल्यापासूनच सांगत होतो, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडीने भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचा ठरवून पोपट केला का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा