रंगनाथ पठारेंना विंदा करंदीकर जीवन गौरव, डॉ. सुधीर रसाळांना मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार

0
36
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: मराठी भाषा विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी आज केली. रंगनाथ पठारे यांना विंदा करंदीकर जीवनगौरव, शब्दालय प्रकाशनाला श्री. पू. भागवत पुरस्कार, डॉ.सुधीर रसाळ यांना मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार, संजय जनार्दन भगत यांना कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार जाहीर झाले आहेत.

मराठी भाषेचा प्रसार, प्रचार करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात शासनास विशेष आनंद होत असून मराठी भाषा दिनी हे पुरस्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते प्रदान करण्यात येतील, असेही देसाई यांनी सांगितले. यावेळी मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा उपस्थित होत्या.

यावर्षीचा ‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार’ रंगनाथ पठारे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. पठारे यांनी महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या अभिजात मराठी भाषा समिती व अभिजात मराठी भाषा मसुदा उपसमितीचे अध्यक्ष, साहित्य अकादमी मराठी भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृतीमंडळाचे सदस्य, वाङ्मय पुरस्कार निवड समित्यांचे अध्यक्ष व सदस्य पद भूषवलेले आहे.

यावर्षीचा श्री. पु. भागवत पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील शब्दालय प्रकाशन यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरुप तीन लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. या प्रकाशन संस्थेद्वारे महाराष्ट्रात आणि गोव्यात मिळून अनेक पुस्तक प्रदर्शने भरविली आहेत. तसेच ही संस्था दरवर्षी “शब्दालय” हा दिवाळी अंक प्रकाशित करते.

 मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार या वर्षी औरंगाबादचे डॉ. सुधीर रसाळ यांना जाहीर झाला असून पुरस्काराचे स्वरुप दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. डॉ.रसाळ यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ३५ वर्षे मराठीचे अध्यापन केले असून गेली ६० वर्षे ते मराठी भाषा, मराठी वाङ्मय आणि मराठी संस्कृती या क्षेत्रात लेखन करीत आहेत.

कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार संजय जनार्दन भगत व मराठी साहित्य परिषद, आंध्रप्रदेश यांना घोषित करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

संजय भगत यांनी महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयाने तयार केलेल्या परिभाषाकोश सामान्य जनतेपर्यंत प्रथम संगणक माध्यमातून पोहचवण्याचे कार्य केले. आधुनिक तंत्रानुसार शासकीय कोश सर्व लोकांना पाहता यावे यासाठी स्वखर्चाने आधुनिकीकरण करून घेतले. मराठीचे अभ्यासक या संकेतस्थळाचा वापर करतात. तर मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश यांच्यामार्फत विविध प्रकाशने प्रकाशित होतात. पंचधारा नियतकालिकांचे प्रकाशन हा उपक्रम दीर्घकाळ चालू आहे. तसेच चर्चासत्रांचेही आयोजन केले जाते.

हे पुरस्कार २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरवदिनी रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा