मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा दणका देत आरे कॉलनीतील मुंबई मेट्रो कारशेडला स्थगिती दिली आहे. या कारशेडचे पुनर्विलोकन केल्याशिवाय पुढील काम होणार नाही. विकास कामे रखडणार नाहीत, परंतु आपले वैभव गमावून कुठलीही विकासकामे होणार नाहीत. रातोरात झाडांची कत्तल मंजूर नाही. एका रात्रीतून झाडच काय झाडाचे पानही तोडता येणार नाही, असे ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. कारशेडला स्थगिती आहे, मेट्रो रेल्वे प्रकल्पाला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रालयात जाण्यापूर्वी ठाकरे यांनी शहिदांना वंदन केले. त्त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकार्यांची बैठक घेऊन ओळख करून घेतली. त्यानंतर विधिमंडळ पत्रकार संघात वार्तालाप करताना त्यांनी ही मोठी घोषणा केली. मी न सांगता मुख्यमंत्री झालो आहे. मी मुख्यमंत्री म्हणून येईन, असे काही सांगितले नव्हते, असा चिमटाही त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काढला.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयावर टीका केली आहे. सर्वोच्च् न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देणे दुर्दैवी आहे. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच यातून दिसून येते. शेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच, असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.