भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार बिनसुरक्षेचे, राज्य सरकारने काढली विशेष सुरक्षा

0
776
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाविकास आघाडी सरकारने राज्यातील काही नेत्यांच्या सुरक्षेत मोठी कपात केली असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील तसेच भाजपचे विदर्भातील नेते सुधीर मुनगंटीवार यांना यापुढे कुठलीही विशेष सुरक्षा असणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. राज्य सरकारने त्यांची सुरक्षा काढून घेऊन त्यांना मोठाच दणका दिला आहे. सुरक्षा कपात केलेल्या अन्य नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचाही समावेश असून फडणवीसांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढून घेतली जाणार आहे.

 दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात दोन मंत्र्यांचाही समावेश आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. राज्य सरकारने या तिघांना दिलेला हा मोठा झटका मानण्यात येतो.

हेही वाचाः फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांत पाटलांच्या सुरक्षेत मोठी कपात, फडणवीसांची बुलेटप्रुफ गाडी काढली!

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि त्यांची मुलगी दिवीजा फडणवीस या दोघींच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. अमृता फडणवीस यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. आता त्यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. रिपाइंचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप आमदार आशिष शेलार, दीपक केसरकर यांच्याही सुरक्षेला कात्री लावण्यात आली आहे.

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्यातील नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला होता. या समितीच्या अहवालावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचाः भाजपमध्ये घमासानः राजस्थानात वसुंधरा राजे समर्थकांची नवी संघटना, पक्षश्रेष्ठींना इशारा

भाजप म्हणते हे सुडाचे राजकारणः नेत्यांच्या सुरक्षा कपातीवरून आता राज्यातील राजकारण पेटण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांच्या सुरक्षेतील कपात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे हे कोत्या मनोवृत्तीचे, सुडाचे राजकारण आहे, असा आरोप भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा