मंत्रिमंडळ विस्तारात अशोक चव्हाण, अमित देशमुख, धनंजय मुंडे, राजेश टोपे यांचा समावेश निश्चित

0
185
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारच्या आज होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि अमित देशमुख यांचा समावेश निश्चित झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे आणि राजेश टोपे यांचाही समावेश निश्चित आहे.

आज दुपारी एक वाजता विधिमंडळाच्या प्रांगणात महाविकास आघाडीचे 36 मंत्री शपथ घेणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या 36 नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. काँग्रेसच्या वतीने शपथ घेणाऱ्या 8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्र्यांची यादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केली आहे. या यादीत कॅबिनेट मंत्रिपदासाठी अशोक चव्हाण, के. सी. पडवी, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, सुनिल केदार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांच्या तर राज्यमंत्रिपदासाठी सतेज पाटील आणि डॉ. विश्वजित कदम यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश टोपे आणि धनंजय मुंडे हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. धनंजय मुंडे यांनी ट्विट करून आपण मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे म्हटले आहे. आईच्या आशीर्वादाने, वडील स्व. अण्णा, आप्पा( स्व. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे) यांच्या प्रतिमेचे दर्शन घेत आणि संतश्रेष्ठ भगवान बाबा यांचे पूजन करत मी या प्रवासाला सुरुवात करत आहे, असे मुंडे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

या शपथविधी समारंभानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशांनुसार नव्या मंत्र्यांचे खातेवाटपही आजच होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा