दहावीच्या परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम, उच्च न्यायालयात मांडणार भूमिका

0
37
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः तुम्ही शिक्षणाचा खेळखंडोबा मांडला आहे का? परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण कसे करता? बारावीची परीक्षा घ्यायची म्हणता आणि दहावीची परीक्षा मात्र रद्द करता? हा भेदभाव का? अशा प्रश्नांची सरबत्ती करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारल्यानंतर दहावीची रद्द केलेली परीक्षा पुन्हा घ्यावी लागते की काय, अशी चर्चा सुरू झाली असतानाच दहावीची परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम असल्याचे शालेय शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

इयत्ता बारावी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या मुद्यांवर आज, रविवारी केंद्रीय पातळीवर संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली देशातील सर्व शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव आणि राज्य मंडळांचे अध्यक्षांची बैठक झाली. या बैठकीनंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या परीक्षेबाबत राज्य सरकारची भूमिका मांडली.

 उच्च न्यायालयाने दहावीच्या परीक्षा घेण्याबाबत विचारणा केली आहे. राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य सरकार उच्च न्यायालयात आपली बाजू मांडेल. सध्याची परिस्थिती असाधारण आहे. असाधारण परिस्थितीत असाधारण निर्णय घ्यावेच लागतात, असे गायकवाड म्हणाल्या.

मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केलेले प्रश्न आणि केंद्र सरकारची परीक्षांबाबतची भूमिका या सर्वच विषयांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासी येत्या दोन दिवसांत चर्चा होणार आहे. त्यावेळी परीक्षांच्या मुद्यावर सविस्तर विश्लेषण होईल. सोमवारी मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ दिली आहे, असे गायकवाड म्हणाल्या.

दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. त्याबाबतही गायकवाड यांनी भूमिका मांडली. उच्च न्यायालयाला आम्ही आमचे म्हणणे सांगू. ही असाधारण परिस्थिती आहे. दुसरी लाट कमी असेल असे वाटले होते. पण कोरोना संसर्गात वाढ झाली आहे. दुसऱ्या लाटेचा मुलांवर परिणाम व्हायला लागला आहे. तिसऱ्या लाटेचा मुलांना धोका आहे. आम्ही आमचे म्हणणे न्यायालयाला पटवून देऊ. न्यायालयही सहानुभूतीपूर्वक विचार करेल याची मला खात्री आहे, असेही गायकवाड म्हणाल्या.

 कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची आपण चर्चा करत आहोत. त्याचा सर्वाधिक परिणाम मुलांवर होण्याची शक्यता आहे. कुटुंबात जर कुणी कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्या कुटुंबातील मुलाची मानसिकता काय असेल, हे समजून घेतले पाहिजे. मुले वर्षभरापासून परीक्षेची तयारी करत आहेत. विद्यार्थ्यांचे हित, त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बघूनच परीक्षेसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे गायकवाड म्हणाल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा